भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील श्रीक्षेत्र माणकेश्वर महादेव मंदिर परिसरात रविवार दि.15 जून रोजी एक भव्य स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून मंदिर परिसरात साचलेल्या घनकचऱ्यामुळे परिसराची अत्यंत दुर्दशा झाली होती. पत्रावळी, पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिक ग्लास, दारूच्या बाटल्या आणि इतर कचऱ्यांनी मंदिराचे पावित्र्य धोक्यात आले होते.
गणेश महाराज अंधारे यांच्या उपोषणानंतर प्रशासनाने या समस्येची गांभीर्याने दखल घेतली आणि मंदिर परिसरात बकरी कापणे व मांसाहार शिजवण्यावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली. या पार्श्वभूमीवर आज ग्रामस्थ माणकेश्वर, शिवभक्त, संत जोगा परमानंद वारकरी शिक्षण संस्था देवगाव, बार्शी येथील काही संघटना व वारकरी संप्रदाय यांनी संयुक्तपणे स्वच्छता मोहिमेची अंमलबजावणी केली. मोठ्या प्रमाणावर साचलेल्या कचऱ्यामुळे दोन ट्रॅक्टर भरून घनकचरा मंदिर परिसरातून बाहेर काढण्यात आला. पुढील टप्प्यात संपूर्ण मंदिराची सखोल स्वच्छता करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. ग्रामपंचायत माणकेश्वर यांच्या वतीने परिसरात कचरा साठवण्यासाठी कचराकुंड्यांचे वाटप करण्यात आले असून, भांडगाव ग्रामस्थांनी परिसरात वाढलेल्या तणांवर तननाशकाची फवारणी करून स्वच्छतेला हातभार लावला.
सर्वांच्या सहकार्यामुळे मंदिर परिसरात ही स्वच्छता मोहिम अत्यंत यशस्वी झाली असून, मंदिराचे पावित्र्य टिकवण्यासाठी ही एक महत्त्वाची पावले ठरली आहेत. ग्रामीण जनतेच्या एकत्रित सहभागातून एक स्वच्छ, सात्विक आणि पवित्र माणकेश्वर साकार होत असल्याचे चित्र या उपक्रमातून स्पष्ट दिसून येते.