तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापूरात आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर शह, कटशाहचे राजकारण रंगले आहे. नगर परिषदची सत्ता मिळविण्यासाठी महायुती विरोधात महाविकास आघाडी यांच्यात जोरदार चुरस निर्माण होत आहे. यामुळे राजकारणी मंडळी आता एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप करीत असल्याचे बोलले जात आहे.
या नगर परीषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मटका बुक्कीवर मारलेल्या धाडीच्या बाबतीत देखील शहरात राजकीय चर्चा सुरू आहे. मटका, ड्रग्ज, चक्री सट्टा यासह अनेक अवैध धंद्यामुळे तुळजापूर शहर दिवसेंदिवस बदनाम होत आहे. शासन, प्रशासनाने शहरात अवैध धंदे सुरू होऊ न देणे गरजेचे होते. या अवैध धंदे वाढीस शासन, प्रशासनाचे दुर्लक्षही कारणीभुत असल्याचा आरोपही संतप्त शहरवासियांमधून केला जात आहे. अवैध धंद्याकडे दुर्लक्ष करणारे प्रशासन यास जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे तुळजापूर शहरवासियांना बदनामीस सामोरे जावे लागत आहे. ड्रग्ज, मटका, चक्री सट्टा प्रकरणी प्रशासनाने वेळीच कठोर भूमिका घेऊन कर्तव्य पार पाडले असते तर बदनामीची वेळ शहरवासियांवर आलीच नसती. तीर्थक्षेत्र तुळजापुरात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरू राहणार नाहीत याची दक्षता प्रशासनाने घेण्याची गरज आहे.
शहरात इतर मटका बुक्या चालु आहेत. त्यावरही अशी कारवाई होणार का? असा सवाल शहरवासियांमधून उपस्थित होत आहे. आगामी नगर परीषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिनधास्तपणे चालु असलेले अवैध धंदे आताच उघडकीस येत आहेत. हे अवैध धंदे पोलिसांनी उघडकीस आणले नाहीत तर राजकिय कुरघोड्यातून व शहरवासियांच्या जन प्रक्षोभामुळे उघडकीस आले आहेत हे विशेष आहे. ड्रग्ज प्रकरण तपास चालु असतानाच लगेचच आता मलबा हाईटस परिसरात पोलिसांनी टाकलेल्या मटका बुकीवरील धाड प्रकरण चर्चेत आले. यापुढे आणखी कुठले प्रकरण बाहेर येणार याची उत्सुकता शहरवासियांना लागली आहे. मलबा हाईटस परिसरातील एका इमारतीमधील साठे नामक व्यक्तीच्या फ्लॅटमधून हा अवैध धंदा चालु होता. त्याचे कनेक्शन मोहळ, सांगोला,
वडाळा या पश्चिम महाराष्ट्रात पोहचल्याचे दिसून आले. ड्रग्ज सारखेच सोलापूर कनेक्शन पुढे आले. यातही परजिल्ह्यातील बाह्य अवैध धंदेवाल्यांचे कनेक्शन पुढे आले. ड्रग्ज नंतर ऑनलाईन मटका धाडीचे मोठे परिणाम आगामी तुळजापूर नगर परीषद निवडणुकीच्या राजकारणावर होण्याची शक्यता आहे. सध्या विविध पक्षाचे समर्थक सोशल मिडीयावर पोस्ट टाकुन कुणीही धुतल्या तांदळासारखे नाही हे दाखविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. तुळजापूर शहरात अवैध धंद्याच्या माध्यमातून आगामी नगर परीषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी विरोधक यांच्यात मोठे शहकाटशहाचे राजकारण सुरु झाले आहे. या राजकारणमुळे संभाव्य लोकप्रतिनिधींची नैतिकता उघड होत आहे. नगर परीषद निवडणूकीच्या अनुषंगाने ड्रग्जनंतर आता मटक्याच्या माध्यमातून सत्ताधारी विरोधक एकमेकांवर आरोप, प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप करण्याची संधी कोणीही सोडत नाही. दिवसेंदिवस शहकटशाहचे राजकारण प्रचंड कुरघोडीचे होत असल्याने अशीच परिस्थिती राहीली तर तुळजापूरची शांतता धोक्यात येण्याची शक्यता आहे. नगर परीषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मटका बुक्कीवर मारलेल्या धाडीबाबतीत शहरात मोठे राजकारण सुरू आहे. तुळजापूर नगर परीषदवर आपली सत्ता येण्यासाठी महायुती विरोधात महाविकास आघाडी यांच्यात जोरदार चुरस निर्माण होत असून यातून राजकारण रंगल्याची चर्चाही नागरिकांमध्ये सुरू आहे.