धाराशिव (प्रतिनिधी)-  एप्रिल व मे  महिन्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती, फळबागा, घरे, जनावरे व इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागांत वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे पाठवावा अशा सूचना आमदार पाटील यांनी यावेळी केली.

वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने धाराशिव तालुक्यातील महादेव माळी या शेतकऱ्याच्या काढणीस आलेल्या टमाट्याच्या बागेचे मोठे नुकसान झाले आहे.याचप्रमाणे जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याशिवाय अनेक भागांत घरांची पडझड झाली असून, जनावरांचे मृत्यू, वीजपुरवठा खंडित होणे, शेती पाण्याखाली जाणे आदी गंभीर प्रकार समोर आले आहेत.

या पार्श्वभूमीवर ‌‘मित्र' चे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे नुकसानग्रस्तांची तातडीने दखल घेऊन महसूल व कृषी विभागामार्फत पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना तातडीने आर्थिक मदत मिळावी यासाठी शासनाकडे वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली आहे.


 
Top