धाराशिव (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी देवीच्या चैत्र यात्रेचा महोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांच्या उत्साहात साजरा झाला. यात्रेच्या दिवशी, 16 एप्रिल रोजी, कर्नाटक राज्यातील कुन्नूर (ता. निपाणी, जि. बीदर) येथील भाविक प्रशांत हरिश्चंद्र करडे पाटील यांची 2 वर्षांची चिमुरडी पियुषा मंदिर परिसरात अचानक हरवली होती.
मुलगी हरवल्याचे लक्षात येताच करडे पाटील यांनी तात्काळ श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या सुरक्षा विभागाशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य ओळखून सुरक्षा विभागाने तातडीने सर्व यंत्रणा सक्रिय केल्या. मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची मदत, व त्या भागातील सूचनांची घोषणा अशा विविध उपाययोजना करून अवघ्या काही वेळात हरवलेली चिमुकली पियुषा हिला शोधून काढण्यात यश आले.
सुरक्षेच्या दृष्टीने गर्दीच्या काळातही इतक्या तत्परतेने व काळजीपूर्वक कार्य करणाऱ्या मंदिर संस्थानच्या सुरक्षा विभागाने ही एक कौतुकास्पद कामगिरी पार पाडली. हरवलेली पियुषा सुखरूप सापडल्यामुळे तिच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला.
या प्रसंगी, भाविक प्रशांत करडे पाटील यांनी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासनाचे विशेष आभार मानत त्यांच्या कार्यक्षमतेची प्रशंसा करणारे औपचारिक आभारपत्र मंदिर संस्थानला पाठवले आहे. त्यांनी आपल्या पत्रात मंदिर प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त करत भाविकांच्या सुरक्षिततेबाबत असलेली संस्थानची काळजी अधोरेखित केली आहे. या घटनेतून, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान केवळ धार्मिक दृष्टिकोनातून नव्हे, तर सामाजिक जबाबदारीच्या दृष्टिकोनातूनही किती जागरूक आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.