धाराशिव (प्रतिनिधी)- पावसाळ्याच्या तोंडावर संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा धोका लक्षात घेता, धाराशिव शहरातील सर्व रहिवाशी व मालमत्ताधारकांनी धोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या कराव्यात अशी आवाहन धाराशिव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती वसुधा फड यांनी केले आहे.
धाराशिव शहरातील ज्या इमारती व बांधकामे धोकादायक अवस्थेत आहेत किंवा ज्यांचे काही भाग कमकुवत व धोक्याच्या श्रेणीत मोडतात,अशा ठिकाणी कोणीही वास्तव्य करू नये.तसेच आगामी काळात होणाऱ्या अतिवृष्टी, वादळ, भूस्खलन व इतर आपत्तीजनक हवामानामुळे अशा धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्यांचे प्राण व मालमत्तेचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे अशा इमारती तात्काळ रिकाम्या करून सुरक्षित स्थळी स्थलांतर करणे अत्यावश्यक आहे.
या संदर्भात घरमालक,भोगवटादार व संबंधित कुटुंबियांनी आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून तातडीने उपाययोजना कराव्यात,असे आवाहन केले आहे. विशेषतः अशा धोकादायक इमारती व त्यांचे भाग रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले असून,कोणतीही दुर्घटना झाल्यास संबंधित मालक व भोगवटादार यांना जबाबदार धरले जाईल,असेही स्पष्ट करण्यात आले आहे.महाराष्ट्र नगरपरिषद,नगर पंचायत व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 मधील कलम 195 व त्याच्याशी संबंधित इतर कलमांनुसार या धोकादायक इमारतींना नोटीस बजावण्यात आलेल्या असून,योग्य ती कारवाई करण्यास प्रशासन कटिबद्ध आहे.
शहरवासियांनी आपला व आपल्या कुटुंबियांचा जीव वाचवण्याच्या दृष्टीने गांभीर्याने विचार करावा.त्यामुळे याची दखल घ्यावी. कुठल्याही प्रकारची हानी झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहणार नाही,असा स्पष्ट सूचना वजा इशारा फड यांनी दिला आहे.तसेच या सूचनेनंतर शहरातील लोकप्रतिनिधी,राजकीय नेते आणि समाजसेवक यांनी नागरिकांमध्ये जागरूकतेचे वातावरण निर्माण करून धोकादायक असलेल्या इमारतींमधील स्थानिक नागरिकांना प्रशासनाच्या सूचनेची अंमलबजावणी करण्यास भाग पाडावे व नगर परिषद प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन देखील मुख्याधिकारी फड यांनी केले आहे.