धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत दुप्पट नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे शुक्रवारी (दि.23) निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात दुधगावकर यांनी म्हंटले आहे की, 22 मे 2025 पर्यंत धाराशिव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने कहर केला असून जवळपास 350 हेक्टर क्षेत्रावरील फळबागा, पीके, भाजीपाला याचे 100 टक्के नुकसान झालेले आहे. याचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसलेला आहे. या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील 40 जनावरांचा बळी गेला असून 50 ते 60 घरांची पडझड झालेली आहे. जिल्ह्यात आठ महसुल सर्कलमध्ये अतिवृष्टी झालेली आहे. या पावसामध्ये दोन व्यक्तींचा वीजेच्या प्रकोपामध्ये बळी गेलेला आहे.

या नुकसानीचे पंचनामे झालेले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ आर्थीक मदत द्यावी व अवकाळी पावसामुळे मृत झालेल्या मानव, गाय, म्हैस, बैल, घोडा, शेळी, मेंढी, वासरे, रेडकू, कोंबडया यांच्या सानुग्रह अनुदानात दुप्पट्टीने वाढ करुन येत्या आठ दिवसात संबंधीत शेतकऱ्यांना आर्थीक मदत देणे संदर्भामध्ये आदेशीत करावे अशी मागणी करण्यात आली आहे.


 
Top