धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तहसील कार्यालयाच्या QR कोड ई-लायब्ररी आणि अधिकृत वेबसाईटचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती शोभा जाधव यांच्या हस्ते २६ एप्रिल रोजी झाले.यावेळी तहसीलदार डॉ.मृणाल जाधव,नायब तहसीलदार,तलाठी,महसूल कर्मचारी तसेच कोतवाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तहसील कार्यालयाचा कारभार अधिक लोकाभिमुख,पारदर्शक आणि नागरिकांच्या उपयोगासाठी सुलभ व्हावा या उद्देशाने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. गावागावात दाखले मिळवण्यासाठी येणाऱ्या शेतकरी व ग्रामस्थांना,तसेच महसूल कर्मचारी व वकील बांधवांना महसूल विषयक कायदे,नियम व परिपत्रके सहज उपलब्ध होण्यासाठी ही ई-लायब्ररी आणि वेबसाईट उपयुक्त ठरणार आहे.या माध्यमातून महसूलविषयक कामे अधिक गतिमानपणे पार पाडली जातील,असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
ई-गव्हर्नन्सच्या दिशेने मुख्यमंत्री शंभर दिवस कृती कार्यक्रमांतर्गत राबवलेल्या या उपक्रमामुळे तहसील कार्यालय आणि नागरिक यांच्यातील अंतर कमी होईल आणि विविध शासकीय उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत लवकर पोहोचू शकेल. धाराशिव तालुक्यातील नागरिकांनी या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,असे आवाहन तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांनी केले.पुढील टप्प्यात गाव पातळीवरही तलाठी कार्यालयात अशीच व्यवस्था सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.