परंडा (प्रतिनिधी)-गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य सेवेमधे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम करावे अन्यथा दि. 23 एप्रिल पासून बेमुदत आंदोलन करण्यात येईल असा इशारा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
परंडा येथील उपजिल्हा रुग्णालयात आज कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने रूग्णालय अधीक्षक डॉ. विश्वेश कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, रूग्णालयात काम करणारे कंत्राटी कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय कमी वेतनावर काम करत आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाहीत. कोरोना महामारीच्या काळात या कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम केले. मात्र अद्याप या कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आले नाही. त्यामुळे कंत्राटी कर्मचारी अडचणीत आले असून त्यांची कुचंबणा होत आहे.
याचा विचार करून शासनाने आरोग्य सेवेतील कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम करावे अन्यथा दि.23 एप्रिल पासून बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा निवेदनात दिला आहे.यावेळी डॉ.आनंद मोरे यांच्यासह रूग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.निवेदनावर कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.