धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील ढाबे व हॉटेलमधून अनाधिकृतपणे होणारी मद्य विक्री तसेच वाईन शॉप व बिअर शॉपी मधून अवैध मद्य विक्री करणाऱ्यांवर कायमस्वरूपी कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी धाराशिव जिल्हा परमिट रूम असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. त्याचबरोबर परमिट रूम चालकांवर होत असलेला अन्याय दूर करावा अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. 

निवेदनात म्हटले आहे की,  जिल्ह्यात परमिट रूम अनुज्ञप्ती नूतनीकरण फी 15 टक्क्याने वाढवल्यामुळे आणि शासनाने 10% व्हॅट  वाढविल्याने याला  कंटाळून 20 ते 25 अनुज्ञप्ती धारकानी नुतनीकरणच केलेले नाही. तरी ही बाब शासनाला न परवडणारी आहे.  शासनाचा महसुल देखील मोठ्या प्रमाणात बुडणार आहे. परमिट रूम व्यवसाय धारकाच्या व्यवसायामध्ये बऱ्याच अडचणी निर्माण झालेल्या आहेत. यामुळे परमिटरूम व बिअरबार मधील मद्य विक्रीची बऱ्याच प्रमाणात घट झालेली आहे.

सध्या धाराशिव शहरात व जिल्ह्यात अनेक विनापरवाना अनाधिकृत ढाबे व हॉटेल्स आहेत. या ढाबे, विना परवाना हॉटेल्स, हातगाडे चालकांकडून अनाधिकृतपणे सर्रास मद्यविक्री केली जाते  तरी त्यांच्यावर कसलेही गुन्हे दाखल केले जात नाहीत. केवळ किरकोळ स्वरुपाचे गुन्हे दाखल करुन त्यांना सोडले जाते. त्यामुळे अनुज्ञप्तीधारकावर हा अन्यायच आहे.

तरी  त्यांच्यावर कलम 68/84 नुसार जागा मालक, ढाबा चालक यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करावे. दोन गुन्हयापेक्षा जास्त गुन्हे असणाऱ्या व्यक्तींना हद्दपार करण्यात यावे.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त मुंबई यांनी दि. 28 मार्च 2025 रोजी क्र. 112025/ अनाधिकृत मद्य विक्री/ मोहिम / 9 या परिपत्रकानुसार कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. तरी या परिपत्रकाची अंमलबजावणी व्हावी.

या सर्व बाबींचा विचार होवून अशा अनाधिकृत व्यवसायावर कायमस्वरूपी कडक कारवाई करून आम्हा अधिकृत व्यवसायीकांना सहकार्य करून न्याय दयावा अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर ज्येष्ठ मार्गदर्शक संपतराव डोके, जिल्हा परमिट रूम असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चंद्रकांत आवटे, उपाध्यक्ष धर्मराज आण्णासाहेब सुर्यवंशी, सचिव बाळासाहेब दगडू लाकाळ, सुभाष शेट्टी, दयानंद नलावडे, कुमेश पवार, सोमलिंग खरे, नवनाथ भोसले, योगेश जाधव, सुनील सुर्यवंशी, सुहास पाटील, दत्तात्रय सुर्यवंशी, राजाभाऊ सुर्यवंशी, ज्ञानेश्वर घोगरे आदींची स्वाक्षरी आहे.

 
Top