धाराशिव (प्रतिनिधी)- परंडा ते देवगाव मार्गावर दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पोलिसांनी अटक करून एक गावठी कट्टा व दोन कत्ती, दुचाकी असा एकूण 38 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यातील दोघे दरोडेखोर फरार झाले आहेत.

पोलिस निरीक्षक दिलीपकुमार पारेकर यांच्या पथकास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एका व्यक्तीकडे अवैधरित्या शस्त्र बाळगलेले असून, तो परंडा हद्दीत येणार असल्याबाबत माहिती मिळाली. सपोनि शंकर सुर्वे, पोलिस हवालदार नितीन गुंडाळे, विशाल खोसे व पो.ना. मधुसूदन महानुभव यांनी एक पथक तयार करून दि. 14 मार्च रोजी परंडा ते देवगाव मार्गावर दिपक गरड यांच्या परंडा ते कात्राबाद रस्त्यालगतच्या शेताजवळ सचिन इतापे, तुषार शिंदे (रा. लोणी, ता. परंडा), वैभव कोडलिंगे (रा. शेंद्री, ता. बार्शी), सुजित पवार, चैतन्य शेळके (रा. भोत्रा, ता. परंडा) शहरात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने एकत्र येत दरोड्याची तयारीत असताना पोलिस पथकाने तिघांना पकडले. दोघे फरार झाले. त्यांच्याकडे विना परवाना एक सिल्व्हर रंगाची गावठी बनावटीची पिस्टल व एक जिवंत राउंड, दोन धारदार कत्ती व एक विना क्रमांकाची दुचाकी असा एकूण 38 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

चैतन्य शेळके व सुजित पवार यांनी हद्दपार प्रस्तावाचा भंग करून गृहविभागाची परवानगी न घेता आदेशाचे उल्लंघन केले. या प्रकरणी पोलिस हवालदार नितीन गुंडाळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला. सचिन इतापे, तुषार शिंदे, सुजित पवार यांना परंडा न्यायालयाने 18 मार्चपर्यत पोलिस कोठडी सुनावली. वैभव कोडलिंगे (रा. शिंद्री, ता. बार्शी) व चैतन्य शेळके (रा. भोत्रा) हे दोघे फरार झाले आहेत. सदरची कामगिरी ही पोलीस निरिक्षक परंडा दिलीपकुमार पारेकर, सहा.पोलीस निरिक्षक शंकर सुर्वे, पोलीस हवालदार नितिन गुंडाळे, विशाल खोसे, मधुसुदन महानुभव, साधु शेवाळे, श्रीकांत भांगे व होमगार्ड दत्ता मेहेर, विजय रोडगे सहभागी झाले होते.

 
Top