धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तहसील कार्यालयात भेट देवून विविध प्रकारची अनियमितता बाहेर काढणारे उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांना शासन आदेशाचे पालन न करणे, वरिष्ठांचे आदेश न पाळल्याचे कारण देत निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावरील या निलंबन कारवाईमुळे सर्वसामान्यांतून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

धाराशिवच्या तहसील कार्यालयात गेल्या अनेक दिवसापासून गैरप्रकार व अनियमित कारभार सुरू असल्याच्या तक्रारी येत होत्या. यावर उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांनी येथे दोन आठवड्यापुर्वी थेट भेट देवून दप्तराची तपासणी केली आणि अनियमितता बाहेर काढली होती. दरम्यान, अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करत काही कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. तहसीलदार, तहसील कार्यालयातील कर्मचारी व डव्हळे यांच्यातील हा वाद विकोपाला गेला होता. यामध्ये डव्हळे यांची बदली करावी किंवा आम्हा सर्वांची बदली व्हावी, असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला. अखेर संजयकुमार डव्हळे यांना निलंबित करण्या प्रताप शासनाने केला आहे. वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे, वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई अपेक्षित असतानाही दुर्लक्ष करणे, कर्मचाऱ्यांना धमकावणे, महिला अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात असभ्य वर्तन करणे, विविध संघटनेमार्फत प्राप्त तक्रारीनुसार डव्हळे यांना कारणे दाखवा नोटीस दिली होती. नोटीसला उत्तर न देणे आदी कारणे दाखवून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबन काळातील त्यांचे मुख्यालय धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालय असणार असून, त्यांना पूर्व संमतीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. 


अधिकाऱ्यांमधील वादाचा फटका

तहसील कार्यालय तपासणीसह इतर प्रशासकीय कामातून महसुलमधील अधिकाऱ्यांमध्ये सुप्त वाद होता. या वादाचे रूपांतर थेट डव्हळे यांच्या निलंबनात झाले आहे. 


माझ्यावर निलंबनाची कारवाई मला बातमीतूनच समजली. माझे म्हणणे ऐकून कारवाई करणे अपेक्षित होते. पण मला म्हणणे मांडण्याची संधी दिली नाही. कोणत्या नियमाचे पालन केले नाही, वरिष्ठांच्या आदेशानुसारच मी तहसील कार्यालयाची तपासणी केली होती. जे आढळले त्याचा अहवालही सादर केला आहे. 

संजयकुमार डव्हळे

उपविभागीय अधिकारी

 
Top