धाराशिव (प्रतिनिधी)- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 च्या प्रचाराचा आता वेग वाढत आहे. विविध राजकीय पक्षांचे आणि अपक्ष उमेदवार आपल्या मतदारसंघातील जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करत आहेत. उमेदवार मतदारापर्यंत पोहचण्यासाठी त्यांच्या आवाजातील ध्वनी संदेश (व्हाईस मेसेज) आणि लघु संदेश (एसएमएस) मतदारांच्या भ्रमणध्वनी पाठवू शकतात.

परंतु हे संदेश मतदारांपर्यंत प्रसारीत करण्यापूर्वी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या शिफारशीसह जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व माध्यम संनियंत्रण समितीची (एमसीएमसी) परवानगी घेणे आवश्यक आहे. विनापरवानगी इलेक्ट्रॉनिक्स फॉरमॅटमधील कोणत्याही प्रसिध्दी साधनाचा व प्रसिध्दी तंत्राचा वापर करण्यावर निवडणूक आयोगाने प्रतिबंध केला आहे.याचा फटका उमेदवाराच्या खर्चाच्या ताळमेळाला बसू शकतो. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या खर्च सनियंत्रण विभागाकडून यासंदर्भात सूचना जारी केल्या आहेत. उमेदवारांना प्रसिध्दीविषयक कोणतेही साहित्य वापरताना माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीची (एमसीएमसी) परवानगी अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले आहे.

20 नोव्हेंबर 2024 या मतदानाच्या दिवशी आणि त्याच्या एक दिवस अगोदर म्हणजे 19 नोव्हेंबर रोजी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या जाहिरातीचे माध्यम प्रमाणिकरण आणि माध्यम संनियंत्रण समितीकडून (एम.सी.एम.सी.) पूर्व प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे.यासाठी विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध आहे.जाहिरात प्रसारित होण्याच्या 48 तास अगोदर राजकीय पक्ष,उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी जाहिरात प्रमाणीकरणासाठी जाहिरात व अर्ज सादर करावा.अनोंदणीकृत राजकीय पक्ष किंवा इतर व्यक्तींनी किमान सात दिवसापूर्वी समितीकडे अर्ज करणे आवश्यक आहे.माध्यम प्रमाणीकरण व माध्यम सनियंत्रण समिती अर्थात एम.सी.एम.सी समिती ही अर्ज प्राप्त झाल्यानंतर तो अर्ज 48 तासात निकाली काढेल. 


 
Top