धाराशिव (प्रतिनिधी)-  कृष्णाला बऱ्याच गोष्टी मिळाल्या नाहीत त्याच्या जन्मानंतर तो लगेच आई-वडिलांपासून वेगळा झाला, नंतर नंद-यशोदा भेटले पण आयुष्यातून तेही गेले. राधा गेली, गोकुळ गेले, मथुरा गेली  त्याच्या आयुष्यात काही ना काही निसटतच गेले. हा देखावा धाराशिव येथे महालक्ष्मी समोर डॉ. कविता शेळकीकर यांनी उभा केला होता. शहरातील अनेकांनी भेट देवून देखाव्याचे कौतुक केले.

या देखाव्यात कृष्णाने आयुष्यभर त्याग केला तो पण अगदी आनंदाने. ज्याला कृष्ण समजला त्याच्या आयुष्याचा सोहळा झाला. आयुष्यात काही सोडावं लागलं तरीही खुश कसं राहायचं हे कृष्ण शिकवतो.

कुरुक्षेत्रावरच्या कृष्णनीतीपेक्षा या गोष्टी जास्त व्याकुळ करतात. आयुष्यात काही जमलं नाही तरी कृष्ण बनून हातातून निसटलेल्या गोष्टीचा, क्षणांचा, स्वप्नांचा, आठवणींचा सोहळा करता आला पाहिजे. पहिली शिवी दिल्यानंतर मुंडके छाटण्याची शक्ती असून देखील नव्व्याण्णव आणखीन शिव्या ऐकण्याची क्षमता ज्याच्यात आहे तो कृष्ण आहे. सुदर्शन चक्रासारखं शस्त्र असून देखील हातात नेहमी बासरी आहे तो कृष्ण आहे. द्वारकेसारखे वैभव असून देखील सुदामासारखा मित्र आहे तो कृष्ण आहे. मृत्यूच्या फण्यावर उभा राहिलेला असून देखील जो नृत्य करतो तो कृष्ण आहे. सर्व सामर्थ्यवान असून देखील जो सारथी बनला तो कृष्ण आहे. अशा प्रकारच्या देखाव्यातून संदेश देण्यात आला.

 
Top