धाराशिव (प्रतिनिधी)- उद्या जर राज्य माझ्या हातात आले तर कोणालाही आरक्षणाची गरज भासणार नाही. शेतकरी व मुलांच्या शिक्षणाववर पैसा खर्च व्हायला हवा मात्र नको त्या गोष्टीवर व लोकांवर पैसे खर्च होत आहेत. पुल बांधले जात आहेत. 4 मोठ्या शहरात पैसे खर्च होत आहेत. हजारो कोटींची टेंडर काढली जात आहेत. कारण शहरातील लोकसंख्या वाढली जात आहे. शिक्षण, शेतकरी यांच्यावर जो पैसा खर्च व्हायला हवा तो खर्च केला जात नाही असे राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सकल मराठा शिष्टमंडळाशी बोलताना सांगितले.
राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी या मागणीसाठी मराठा आंदोलक आक्रमक झाले. त्यानंतर त्यांनी राज ठाकरे मुक्कामी थांबलेल्या पुष्पक पार्क या हॉटेलमध्ये तब्बल 3 तास ठिय्या आंदोलन केले. आक्रमक आंदोलनानंतर राज ठाकरे व मराठा आंदोलक यांची आमनेसामने 10 मिनिटे चर्चा झाली.
मी जे बोलता आहे ते तुम्हाला कळणार नाही. विधानसभा निवडणूक झाल्यावर या गोष्टीचा अंदाज येईल. जरांगे यांची लढाई वेगळी आहे. मात्र काही जन तोंडाला पाने पुसत असून, त्यातून राजकीय स्वार्थ साधून घेत आहेत. त्यापासून सावध रहा. असा इशारा यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी दिला. महाराष्ट्रात ओबीसी, दलित व इतर कोणालाही आरक्षणाची गरज नाही. हे प्रगत राष्ट्र आहे इथे शिक्षण व रोजगाराच्या संधी आहेत. महाराष्ट्रात हे आहे म्हणून इथे बाहेरच्या राज्यातील लोक येतात. मोर्चे निघाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस असताना 16 टक्के आरक्षण दिले गेले. मात्र ते फसवे निघाले. जरांगे यांचे आंदोलन सुरू झाल्यावर मी त्यांना भेटलो व सांगितले होते की तुम्ही जी मागणी करताय ती होणार नाही, हे लोक होवू देणार नाहीत. माथी भडकावून संघर्ष घडविणे व मते मिळविणे हा हेतू आहे. असेही राज ठाकरे यांनी सांगितले. मनोज जरांगे पाटील यांच्यशी बोलून आपण आरक्षणासंदर्भातील भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले.