तुळजापूर (प्रतिनिधी) -  श्रीतुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर अंतर्गत विविध संवर्गातील सरळ सेवेच्या रिक्त पदांच्या भरती परीक्षेदरम्यान झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी आमदार कैलास पाटील यांनी श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांना निवेदन देवुन केली आहे.

निवेदनात म्हटले आहे कि, तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर सरळ सेवेच्या 47 रिक्त पदांच्या भरतीसाठी आयबीपीएस मार्फत परीक्षा घेण्यात आली. मात्र या परीक्षेदरम्यान मंदिर संस्थान कार्यालयाकडून आणि आयबीपीएसकडून मोठा गोंधळ निर्माण केल्याच्या घटना घडल्या आहेत. यात प्रामुख्याने वेगवेळ्या पदांसाठी काठिण्य पातळी नुसार परीक्षा होणे अपेक्षित असताना असे झालेले नाही. शिपाई, जनसंपर्क अधिकारी, सहायक जनसंपर्क अधिकारी, लिपिक या

पदांच्या प्रश्नांमध्ये साधर्म्य असून, या परीक्षेमध्ये या सर्वांना एकच प्रश्न पत्रिका देण्यात आल्याचे परीक्षार्थीचे म्हणणे आहे. सदर ऑनलाइन परीक्षेसाठी परीक्षार्थीना देण्यात आलेले युजरनेम आणि पासवर्ड परीक्षा केंद्रावरील संबंधित अधिकाऱ्यांनी लिहून स्वतःकडे घेतले आहेत. विविध संवर्गातील पदासाठी उमेदवाराने स्वतंत्र अर्ज केल्यानंतर त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क आकारण्यात आले. मात्र त्या पदासाठी एकच प्रश्नपत्रिका संबधित परीक्षार्थीना देण्यात आली आहे. परीक्षा झाल्यानंतर काही दिवसांत प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका देणे आवश्यक असताना ती देण्यात आली नाही. धाराशिव जिल्हा हा आकांक्षित जिल्हा असून तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर कार्यालयात रिक्त पदांच्या भरतीची परीक्षा ही धाराशिव जिल्ह्यात होणे गरजेचे होते. जेणेकरून परीक्षार्थी उमेदवारांची हेळसांड, आर्थिक व मानसिक कुचंबणा झाली नसती. परंतु ही परीक्षा राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आली. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी परीक्षार्थीकडून प्राप्त झाल्या आहेत. 

 
Top