धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा स्त्री रुग्णालय, आर पी कॉलेज, आकाशवाणी कडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी जवळजवळ कंबरे इतके खोल खड्डे पडले आहेत. त्यात गाड्या अडकून पडत आहेत. शाळकरी मुले, कॉलेजचे विद्यार्थी, जिल्हा स्त्री रुग्णालयकडे जाणाऱ्या पेशंट, नातेवाईक व नागरिकांना यामुळे प्रचंड प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. याचा निषेध म्हणून आज भारतीय जनता पार्टी, महायुतीच्या वतीने सदरील खड्ड्यांचे रांगोळीयुक्त पूजन करून बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
भूमीगत गटार योजनेच्या निकृष्ट कामाचा हा नमुना असून अंडरग्राऊंड पाइपलाइनसाठी शहरात केलेल्या खोदकामामुळे सर्वत्र रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. खोदकाम केलेले रस्ते नियमानुसार पूर्ववत करून देणे संबंधित ठेकेदारावर बंधनकारक असूनही माती मुरूम टाकून थातूरमातूर काम केले आहे. यापूर्वीही आम्ही पालिकेकडे यासंदर्भात रितसर तक्रार केली असूनही त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्याचा परिणाम असा नागरिकांना त्रास होतो आहे. याचा निषेध म्हणून आज भारतीय जनता पार्टी महायुतीच्या वतीने सदरील खड्ड्यांचे रांगोळीयुक्त पूजन करून बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. पालिकेने या संदर्भात तात्काळ कारवाई करून नागरिकांना दिलासा दिला नाही तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा नगरपालिकेचे माजी गटनेते युवराज नळे, सुजीत साळुंके यांनी दिले आहे. या प्रसंगी वैभव मोरे, बंटी मुंडे, सौरभ देशमुख, मयुर माळी, अमित महंकाळे, जीवन वणवे, बालाजी करपे, गणेश सुतार, रोहित अमलेकर आदी नागरीक उपस्थित होते.