नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग येथील जि. केंद्रीय प्राथमिक शाळेलगत जीर्ण अवस्थेत असलेली व अतिशय धोकादायक स्थितीत असलेली इमारत शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जि. प. प्रशासनाने तात्काळ पाडुन ती जमीनदोस्त करावी अशी मागणी पालकांनी केली आहे.

नळदुर्ग येथील जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग भरतात. सध्या या शाळेत 200 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेची गुणवत्ता चांगली असल्याने शहरातील पालक आपल्या मुलाला याच शाळेत शिक्षणासाठी पाठवितात. मात्र या शाळेच्या इमारतीलगत निजाम राजवटीत दगड मातीमध्ये बांधण्यात आलेली जुनी व अतिशय जीर्ण झालेली धोकादायक इमारत आहे. या इमारती जवळुनच शाळेतील विद्यार्थी स्वच्छतागृह व मुतारीकडे जातात. सदरील इमारत अतिशय धोकादायक असल्याने याठिकाणी मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही सध्या पावसाळ्याचे दिवस असुन ही इमारत केंव्हाही पडण्याची शक्यता आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी व त्यांच्या जीविताला धोका होऊ नये यासाठी ही धोकादायक ठरत असलेली व जीर्ण झालेली इमारत पाडुन जमीनदोस्त करणे गरजेचे आहे. मात्र सुस्त जि. प. प्रशासनाला या शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे कांही देणे घेणे नाही असे दिसुन येत आहे. कारण या शाळेच्या मुख्याध्यापकांनी गेल्या वर्षी 2023–या शैक्षणिक वर्षांत निजाम राजवटीत बांधण्यात आलेली व अतिशय जीर्ण अवस्थेत असलेली शाळेलगतची ही इमारत पाडावी याबाबत रीतसर प्रस्ताव दिला आहे तरीही जि. प. प्रशासन किंवा शिक्षण विभाग ही इमारत पाडतही नाही किंवा शाळेला पडण्याची परवानगी देत नाही त्यामुळे या शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. विद्यार्थी स्वच्छतागृह व मुतारीकडे जात असताना ही इमारत पडुन दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न पालकांसमोर पडला आहे. वास्तविक पाहता विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन व या शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेल्या प्रस्तावावरून जि. प. प्रशासनाने ही जीर्ण व विद्यार्थ्यांसाठी अतिशय धोकादायक ठरत असलेली इमारत गेल्या वर्षीच पाडणे गरजेचे होते. मात्र आजही जि. प. प्रशासनाने ही इमारत पाडली नाही. निदान आता तरी जि. प. प्रशासनाने ही इमारत पाडुन जमीनदोस्त करावी अशी मागणी पालकांनी केली आहे.     

 
Top