तुळजापूर (प्रतिनिधी) -श्री तुळजाभवानी देवीचे ऐतिहासिक, पुरातन व अतिमौल्यवान दागदागिणे, मौल्यवान सर्व धातूंच्या वस्तूंची पूर्वीप्रमाणेच आलेल्या रूढीनुसार लिखीत आदेश देऊन जबाबदारी निश्चित करावी. श्री देवी तुळजाभवानीची सर्व चल-अचल संपत्ती ही न्यासाची असल्यामुळे संबंधीत सर्वच लोकांकडून पूर्वी प्रमाणेच जामिन घेण्यात  याव्यात अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे श्रीतुळजाभवानी पुजारी मंडळ माजी अध्यक्ष किशोर गंगणे व अँड शिरीष कुलकर्णी यांनी निवेदन देवुन केली.

मुख्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान हे 1962 साली नोंदणी झालेले न्यास आहे. त्याचा न्यास नोंदणी क्रमांक -1024 असा असून विश्वस्थ म्हणून मा. जिल्हाधिकारी धाराशिव तथा अध्यक्ष म्हणून आपण आहात व इतर 4 जण श्री तुळजाभवानी न्यासाचे विश्वस्थ म्हणून गेली अनेक वर्ष काम पाहत आहात, इतर 2 विश्वस्थ हे लोकप्रतिनिधी आहेत. श्री तुळजाभवानी न्यासाची सर्वच चल व अचल संपत्तीचे विश्वस्थ म्हणून मोठी जबाबदारी आपणा सर्वांवर आहे. तिचे विश्वस्थ म्हणून रक्षण करणे हे आपले काम व कर्तव्य आहे. तसेच श्री तुळजाभवानी ट्रस्टचे (न्यासाची) चल व आचल संपत्तीचे (कस्टोडीयन) रखवालदार हे धर्मादाय आयुक्त आहेत. त्यांचीही जबाबदारी कायदयानुसार अधोरेखीत आहे. श्री तुळजाभवानी न्यासाच्या व श्री देवी तुळजाभवानी देवीचे मौल्यवान अलंकार, राजेराजवाडयांनी दान म्हणून दिलेले मौल्यवान नाणी यांचा काळाबाजार, चोऱ्या, अफरातफर होऊन अनेक प्रकरणे फौजदारी न्यायालयात प्रलंबित आहेत. ज्यांच्यावर आरोप झालेले आहेत, ज्यांची चौकशी व्हावयास पाहिजे ते पळून गेलेले आहेत, पोलिसांना ते सापडत नाहीत. याची माध्यमात चर्चा होऊन ही मा.धर्मादाय आयुक्तांनी स्वतःहून कधीही सु-मोटो इन्कवायरी (चौकशी) केली नाही.  तसे आदेश देण्याचे धारीष्ठ दाखविले नाही. धर्मादाय आयुक्त हे श्री तुळजाभवानी न्यासाचे रखवालदार (कस्टोडीयन) आहेत.

न्यासाचे काम हे व्यवस्थीत, काटेकोरपणे नियमानुसार व कायदयानुसार चालणे हे अभिप्रेत आहे. न्यासाचे काम हे घटनेच्या हेतू व उद्दिष्टांन्वये चालून भाविक भक्तांना योग्य सुविधा देणे व त्यांनी श्रध्देने दिलेले दान याचा योग्य विनियोग होणे गरजेचे व महत्वाचे आहे. त्यांचा ही हिशोब ठेवणे अतिमहत्वाचे आहे. श्री तुळजाभवानी देवीचे ऐतिहासिक पुरातन व अतिमौल्यवान दागदागिणे, मौल्यवान सर्व धातूंच्या वस्तू याची निगराणी देखभाल व दैनंदीन सेवा ज्या रूढीपरंपरेप्रमाणे आलेल्या आहेत, सेवा करीत असताना घ्यावयाची काळजी याची नियमावली व सर्व अधिकारी, कर्मचारी व सेवा देणारे सेवेकारी यांची जबाबदारी फिक्स करणे अत्यंत महत्वाचे आहे व श्री तुळजाभवानी देवीच्या रूढीपरंपरा त्यामध्ये बदल करण्याचा कोणासही अधिकार नाही. त्यामुळे रूढीपरंपरेनुसार आलेल्या अलंकाराबाबतच्या सेवा व अधिकार याची नियमावली करून व त्याची जबाबदारी लेखी स्वरूपात आपण आदेश देऊन फिक्स करावी ही आपणास नम्र विनंती. व सर्व विश्वस्थ, अध्यक्ष, व्यवस्थापक प्रशासन, लेखाधिकारी, संबंधित सर्व धार्मिक व्यवस्थापक, अधिकारी, कर्मचारी, मंदिरातील सेवेधारी यांचीही जबाबदारी फिक्स करणे महत्वाचे व गरजेचे आहे. तसे आपण केल्यास कोणतेही बेकायदेशीर कृत्य भविष्यात कोणाकडून ही घडणार नाही व दुसरी महत्वाची मागणी आपणास विनंतीपूर्वक करतोत कि श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्टची सर्व चल व आचल संपत्ती ही श्री तुळजाभवानी ट्रस्टची आहे, ती भक्तांकडून दान म्हणून आलेली आहे, त्याचे संगोपन, त्याची काळजी, निगराणी करणे विश्वस्थांचे काम व कर्तव्य आहे व त्यावर नियंत्रण निगराणी ठेवणे धर्मादाय आयुक्तांचे काम आहे. त्यामुळेच श्री तुळजाभवानी देवीचे पुरातन व ऐतिहासिक व अतिमौल्यवान दागिणे याचे मोल होऊ शकत नाही. त्याची अफरातफर, चोऱ्या, होणे यामध्ये न्यासाचे फार मोठे आर्थिक नुकसान व बदनामी आहे.  या संपत्तीची काळजी घ्यावयाची असेल तर पूर्वीप्रमाणेच सर्वच संबंधीत लोकांकडून पूर्वीप्रमाणेच जामिन घेण्यात यावा ही असे निवेदनात म्हटले आहे.

 
Top