धाराशिव (प्रतिनिधी)- 10 जुलैला मी येतोय धाराशिवला, तुम्हीही या अशी हाक सकल मराठा समाजाने दिली असून, मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठ्यांची महायल्गार शांतता रॅली निघणार आहे. आज झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीत या रॅलीची दिशा ठरली. यावेळी जिल्ह्यातील सर्व तालुका, ग्रामीण भागातून आलेल्या प्रतिनिधी यांनी आपआपली मते मांडली. नियोजनात सक्रीय सहभागी होण्याचा निश्चय केला. जितेगे लढेंगे, हम सब जरांगे, एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करीत परिसर दणाणून निघाला. प्रत्येक गावात तरूण मावळे जनजागृती बैठक घेणार आहेत. आता मरायचं नाही लढायचं असा संकल्प केला. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथून शांतता रॅलीला सुरूवात होणार असून, त्यानंतर अण्णाभाऊ साठे चौक, धारासूर मर्दिनी, हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी दर्गाह, विजय चौक, नेहरू चौक, काळा मारूती चौक, पोस्ट ऑफिस, संत गाडगेबाबा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे निघेल. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एक ऐतिहासिक सभा होणार आहे. स्वयंसेवक या रॅलीचे त्या दिवशी मार्गात नियोजन करतील. या रॅलीत सहभागी होणाऱ्या मंत्री, खासदार, आमदार यासह इतर लोकप्रतिनिधी यांनी या रॅलीत सहभागी होण्यापूर्वी मनोज जरांगे यांच्या 50 टक्केच्या आत ओबीसीतून मराठा आरक्षण मागणीला जाहीर पाठिंबा असल्याचे जाहीर करावे लागणार आहे.

मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीची घोषणा केली असून, 10 जुलै रोजी जरांगे पाटील हे धाराशिव जिल्ह्यात येत आहेत. जरांगे हे 10 जुलै रोजी धाराशिव येथे मुक्कामी आहेत. शांतता रॅलीच्या नियोजनासाठी धाराशिव जिल्हा नियोजन बैठक समर्थ नगर येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात संपन्न झाली. 

 
Top