धाराशिव (प्रतिनिधी)- येथील वर्ग-2 जमिनीचा विषय शेतकरी व शहर वासियांच्या दृष्टीने अतिशय जिव्हाळ्याचा असून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या विनंतीवरून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काल मंत्रालयात याबाबत बुधवार दिनांक 19 रोजी बैठक घेतली आहे. शासन स्तरावर याबाबत सकारात्मक मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असून लवकरच नाममात्र नजराणा आकारून रूपांतरण करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

मराठवाड्यातील वर्ग-2 जमिनीचा विषय शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय जिव्हाळ्याचा असून नाममात्र शुल्क आकारून या जमिनी नियमानुकूल करून वर्ग-1 मध्ये परावर्तित करण्याबाबत आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.सामान्य नागरिक व शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा विषय अत्यंत संवेदनशील असून शासनाने यासाठी पाठक समिती नियुक्त केली आहे. सदरील समिती मराठवाड्यातील सर्व जिल्ह्याकडून वर्ग-2 जमिनीची माहिती घेऊन लवकरच शासनाला अहवाल सादर करणार आहे असे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांच्या मागणीचा सांकल्याने विचार करून याबाबत योग्य तो कायदेशीर मार्ग काढण्याच्या दृष्टीने बैठक घेण्याबाबत आ.पाटील यांनी महसूलमंत्र्यांना विनंती केली होती त्याला अनुसरून बुधवार 19 जून रोजी महसूल मंत्री  राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बैठक घेतली.सदर बैठकीत अनेक महत्त्वाच्या बाबींवर सविस्तर व मुद्देसूद आणि सकारात्मक चर्चा झाली असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले आहे.

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी याच अनुषंगाने महसूल सचिव राजेश कुमार यांची भेट घेऊन हा प्रश्न येत्या अधिवेशनात मार्गी लागावा यासाठी पाठक समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.सदरील बैठकीस माजी जि. प. सदस्य रेवणसिद्ध लामतुरे, माजी नगराध्यक्ष सुनील काकडे, दत्ता पेठे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.


 
Top