तुळजापूर (प्रतिनिधी)- नगर परिषदेची थकबाकी मोठ्या प्रमाणात थकल्याच्या पार्श्वभूमीवर  मुख्याधिकारी श्रीमती प्रियंवदा म्हाडदाळकर (भा.प्र.से.)  यांनी गुरुवार  रोजी वसुली कर्मचारी यांची  आढावा बैठक घेतली. यामध्ये त्यांनी वसुली विभागाच्या कामाचा आढावा घेतला. पंधरा दिवसात वसुली उद्दिष्ट  पुर्ण करा यात हयगय केल्यास  प्रशासकीय कारवाई करण्याचा इशारा या बैठकीत  दिला.

तुळजापूर नगरपरिषद वसुलीचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे ते वाढवण्यासाठी जलद गतीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. सोमवारपासून मुख्याधिकारी स्वतः प्रत्येक थकबाकीदारांना भेटून वसुलीची रक्कम तत्काळ भरण्याबाबत शेवटची संधी देणार असून, ज्यांचेकडे थकीत रक्कमा आहेत त्यांचे तात्काळ नळ कनेक्शन कट करण्याबाबत पाणीपुरवठा विभाग यांना सक्त निर्देश दिले.

प्रत्येक प्रभागातुन दररोज दहा पेक्षा अधिक नळ कनेक्शन बंद करुन त्याचा अहवाल सायंकाळी सादर करण्याचीही सुचना बैठकीत दिली आहे. जे कर्मचारी  वसुली कामांमध्ये हायगय अथवा निष्काळजीपणा करतील त्यांचे चालू महिन्याचे वेतन रोखण्यात येणार आहे. नगरपरिषद कर्मचारी दिनांक 15 मार्च 2024 पासून वसुली मोहिमेमध्ये गती वाढवून व शंभर टक्के वसुली होईल याकडे विशेष लक्ष देणार असल्याचे सांगुन  कामचुकार कर्मचारी यांच्या प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल अशी तंबीच त्यांनी बैठकीत दिली आहे. त्यामुळे सर्व कर्मचारीचे धाबे दणाणले आहेत.  वसुलीचे उद्दिष्ट आगामी 15  दिवसात पूर्ण करण्यासाठी नगरपरिषद मोठ्या प्रमाणावर कार्यवाही करण्यास सुरुवात करत आहे. यासाठी शहरातील थकबाकीदार यांनी तात्काळ रक्कम भरून घेऊन जबाबदार नागरिक होण्याचे दायीत्व पूर्ण करावे असे आवाहन थकबाकीदार यांना केले आहे.


 
Top