धाराशिव (प्रतिनिधी)- वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर कृषिपंप तत्काळ सुरू करण्याच्या उद्देशाने अनेक शेतकऱ्यांनी कृषिपंपांना ऑटोस्विच बसविले आहेत. त्यामुळे परिसरातील सर्व कृषिपंप एकाच वेळी सुरू होऊन रोहित्रावरील भार अचानक वाढतो. परिणामी रोहित्र जळणे, वीजवाहिन्या बंद वा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढते. यातून होणारी गैरसोय व नुकसान टळावे तसेच सुरळीत व योग्य दाबाचा वीजपुरवठा मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी कृषिपंपांना ऑटोस्विचऐवजी कॅपॅसिटर बसवून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी केले आहे.

कृषी क्षेत्रातील कार्यक्षम ऊर्जा वापरात कॅपॅसिटर हे उपकरण महत्त्वाचे आहे. कृषिपंपास कॅपॅसिटर बसविल्यामुळे विद्युत केबल जळण्याचे प्रमाण कमी होते. योग्य विद्युतदाब, केव्हीए मागणी, वीज वापरात बचत आदी फायदे होतात. पुरेशा दाबाने वीजपुरवठा मिळतो, कृषिपंप जळण्याचे प्रमाण कमी होते. तसेच रोहित्रांवरील भार 30 टक्क्यांने कमी होऊन रोहित्र नादुरुस्तीचे व जळण्याचेही प्रमाणही कमी होते. 


ऑटोस्विचचा वापर टाळा

महावितरणकडून या शेतकऱ्यांना दिवसा व रात्री अशा चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा करण्यात येतो. हा वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर शेतात जाऊन कृषिपंप चालू करण्याचा त्रास वाचवण्यासाठी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी कृषिपंपांना 'ऑटोस्विच' लावले आहेत. त्यामुळे वीज येताच कृषिपंप आपोआप चालू होतो. परिणामी रोहित्रांवरील भार एकाचवेळी वाढत असल्याने रोहित्र जळण्याचे किंवा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. ऐन हंगामात रोहित्र जळाल्यास त्याची झळ शेतकऱ्यांनाही सोसावी लागते. त्यामुळे कृषिपंपांना कॅपॅसिटर बसवून ऑटो स्विचचा वापर टाळावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.


 
Top