धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हयात नव्याने विभागीय कार्यालय मंजुर करण्याबाबत प्रस्ताव सादर केला आहे. यात येरमाळा, ईटकुर, दहिफळ व मोहा चार शाखा नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या परंडा विभागीय कार्यालयास संलग्न करणार असल्याने हे भौगोलिक दृष्टया अत्यंत गैरसोयीचे ठरणार आहे. कशामुळे असा मनमानी निर्णय घेण्यात येणार हे समजत नाही.  सरकार असे तुघलकप्रमाणे का वागत आहे असा प्रश्न आमदार कैलास पाटील यांनी सरकारला केला आहे.

येरमाळा ता. कळंब येथे नव्याने उपविभाग तयार करुन येरमाळा, ईटकुर, मोहा, दहिफळ ही शाखा कार्यालये त्यांना संलग्न करावीत व येरमाळा उपविभाग धाराशिव विभागीय कार्यालयास संलग्न करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. धाराशिव जिल्हयात नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या विभागीय कार्यालयाशी संलग्न न करता येरमाळा ता.कळंब येथे उपविभाग कार्यालय नव्याने तयार करुन ते धाराशिव विभागीय कार्यालयाशी संलग्न करण्याबाबत शासनाने निर्णय घेण्याची मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे.


नवीन प्रस्तावित विभागीय कार्यालय 80 ते 90 किलोमीटरवर

येरमाळा ते धाराशिव अंतर 34 किलोमीटर, ईटकुर ते धाराशिव अंतर 58 किलोमीटर, दहिफळ ते धाराशिव अंतर 37 किलोमीटर, मोहा ते धाराशिव अंतर 40 किलोमीटर नव्याने संलग्न करण्यात येणाऱ्या परंडा विभागीय कार्यालयाचे अंतर येरमाळा ते परंडा 58 किलोमीटर व ईटकुर ते परंडा 80 किलोमीटर, दहिफळ ते परंडा 83 किलोमीटर, मोहा ते परंडा अंतर 90 किलोमीटर आहे. ही शाखा कार्यालये परंडा प्रस्तावित विभागीय कार्यालयास जोडल्यास नागरिकांची, शेतकऱ्यांची मोठया प्रमाणात गैरसोय होऊन आर्थिक नुकसान होणार आहे. शिवाय कोणत्याच पध्दतीने संयुक्तीक ठरत नसताना असा अट्टाहास करुन सरकार हा तुघलकी निर्णय का घेतला जात आहे असा सवाल यावेळी आमदार पाटील यांनी उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. 


 
Top