धाराशिव / प्रतिनिधी-

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्षा अंजू एस. शेंडे, यांचे उपस्थितीत दिपप्रज्वलनाने लोकअदालतीचे दि. 30 एप्रिल 2023 रोजी उद्घाटन करण्यात आले.यावेळी  जिल्हा न्यायाधीश आर. एस. गुप्ता, व्ही. जी. मोहिते,  जी. पी. अग्रवाल,  पी. एच. कर्वे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश  जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे सदस्य, सस्ते, कौटूंबीक न्यायालयाच्या न्यायाधीश  मोहिते, अप्पर पोलिस अधिक्षक  नवनीतकुमार काँवत, बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा अध्यक्ष एम. एस. पाटील, जिल्हा शासकीय अभियोक्ता शरद जाधवर, विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष एस. आर. मुंढे, जिविसेप्राचे सचिव वसंत एस. यादव, सर्व न्यायीक अधिकारी, भूसंपादन अधिकारी, महसुल अधिकारी, पोलीस अधिकारी, विमा कंपनी अधिकारी, बँक अधिकारी, ग्रामसेवक व पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ए. डी. घुले, अधिक्षक, जिल्हा न्यायालय, यांनी केले.

 या लोकअदालतीमध्ये तडजोडीने निकाली निघालेल्या १७ प्रकरणांमधील पक्षकार न्यायालयासमोर उपलब्ध नसल्यामुळे व्हीडीओ कॉन्फरन्सींगव्दारे पक्षकारांची ओळख पटवून घेवून त्यामध्ये तडजोड होवून १७ प्रकरणे निकाली काढण्यात आले. यामुळे पक्षकार यांचा वेळ व पैसा यामध्ये बचत झाली तसेच या प्रकरणी पक्षकार व विधीज्ञ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

  तसेच ४ वैवाहीक प्रकरणांमध्ये यशस्वी रित्या तडजोड होवून ब-याच दिवसापासून पती व पत्नी विभक्त राहत असलेल्या प्रकरणांमध्ये आज त्यांच्या मध्ये समेट घडवून चार ही प्रकरणांतील महिलांना सासरी नांदावयास पाठविण्यात आले.

 जिल्ह्यातून मोठ्या संख्येने प्रलंबित एकुण ८०५६ व दावापुर्व एकुण ३० हजार ५९० प्रकरणे सामोपचाराने मिटविण्याकरीता या लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी प्रलंबीत एकुण १ हजार २२८ व दावापुर्व एकुण १३ हजार ५०८ प्रकरणे तडजोडीअंती निकाली काढण्यात आलेली आहेत. त्यामध्ये प्रलंबीत दिवाणी स्वरूपाची ( ८८२), मोटार अपघात कामगार नुकसान भरपाई प्रलंबीत प्रकरणे (६७), भू-संपादन प्रलंबीत प्रकरणे ( ०४), फौजदारी तडजोडपात्र स्वरूपाची प्रलंबीत (०३), वैवाहिक संबंधीची प्रलंबीत (१४), धनादेशाची प्रलंबीत (१४३), बँकेची प्रलंबीत (११९), बँकेची वादपुर्व प्रकरणे (१२६), नगरपालिका व ग्रामपंचायतीची पाणीपट्टी व घरपट्टीचे वादपुर्व प्रकरणे (१३३५८) तसेच गुन्हा कबुलीची (१९) प्रकरणांमध्ये आरोपींनी गुन्हायाची कबुली दिली. मोटार अपघात कामगार नुकसान भरपाई प्रकरणांमधील पक्षकारांना रूपये ३३ कोटी ६३ लाख ८ हजार रुपये नुकसान भरपाई देणेबाबत तडजोड झाली.

  लोक अदालतीमध्ये धनादेश प्रकरणी फिर्यादी पक्षाला रूपये ५ कोटी 52 लाख २ हजार ६९० रुपये वसूली करून देण्यात आली. भू-संपादन प्रकरणांमध्ये रुपये ४७ लाख २ हजार ८३२ रुपये रक्कमेची तडजोड झालेली आहे. प्रलंबीत दिवाणी स्वरुपाच्या प्रलंबीत प्रकरणांत रक्कम रुपये २ कोटी ८९ लाख ३२ हजार १६८ रुपये वैवाहीत संबंधीच्या प्रकरणांमध्ये ३० हजार बँकेच्या प्रलंबीत प्रकरणांमध्ये २० कोटी १३ लाख ४६ हजार ७३१ रुपये  बँकेच्या वादपुर्व प्रकरणांमध्ये रक्कम रुपये १ कोटी ६२ लाख ९ हजार ३४८ रुपये नगर पालिका व ग्रामपंचायतीची पाणीपट्टी व घरपट्टीच्या प्रकरणांमध्ये रक्कम रुपये २ कोटी ३० लाख १७ हजार ४४० रुपयांची तडजोड झाली तर गुन्हा कबुलीची प्रकरणांमध्ये रक्कम ३२ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव वसंत यादव  यांनी कळविले आहे.


 
Top