धाराशिव / प्रतिनिधी-

डॉ. वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुल येथील  कृषि  महाविद्यालयातील अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांनी वनस्पती रोग शास्त्र विभाग अंतर्गत अळंबी लागवड प्रकल्पात धींगरी आळंबीचे उत्पादन घेतले. धिंगरी अळिंबीची (Oyster Mushroom) लागवड  पद्धत सोपी ,कमी कालावधीची व कमी भांडवलामध्ये होणारी असल्यामुळे  विद्यार्थ्यांनी पदवी शिक्षण घेत असताना त्यांच्यात उद्योजकता कौशल्य विकसित व्हावे तसेच कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी फक्त उत्पादक न बनता उद्योजक बनावा या उद्देशाने महाविद्यालयात हा प्रकल्प राबवण्यात  आला होता. 

धिंगरी आळंबीच्या उत्पादनासाठी गहू, तांदूळ, मका, ज्वारी आदींपासून तयार होणारा भुस्सा आणून त्याचे निर्जंतुकीकरण करून त्यापासून मशरूम बेड बनवून त्यावर मशरूम बियाण्याची (स्पॉन) लागवड करण्यात येते. सुमारे २५ दिवसांनी मशरूम काढणीसाठी तयार होतात . यातील पहिले १८ दिवस बेड उबदार आणि अंधाऱ्या जागेत ठेवले जातात  त्यानंतर सात दिवसांसाठी त्यांचे स्थलांतर हे मोकळ्या, खेळती हवा असलेल्या जागेत ‘ग्रोइंग रूम’ केले जाते.  प्रत्येक बेड एक ते दीड किलो उत्पादन  घेतले जाते. मशरूमची टिकवणक्षमता कमी असल्यामुळे  ते खुल्या वातावरणात एक दिवस तर फ्रीजमध्ये तीन ते चार दिवसांपर्यत टिकतात. उत्तम दर्जाच्या मशरूमची थेट विक्री विद्यार्थ्यांनी ४०० रुपये प्रति किलो दराने केली. धाराशिव  शहरात कृषी  महाविद्यालयाच्या  विद्यार्थ्यांनी मशरूम पदार्थांचा स्टॉल उभा करून  मशरूमची भाजी, सूप, मशरूम पकोडे  इत्यादी ची विक्री केली तसेच त्यातून मशरूम उत्पादनाबद्दल जनजागृती वाढण्यास मदत झाली.

 हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी वनस्पती रोग शास्त्र विभागाच्या  प्रा. खरपुडे पी सी  यांचे मार्गदर्शन लाभले .तसेच कृषी महाविद्यालयाचे डॉ.पाटील के. एच , डॉ. गांधले ए .ए, प्रा.सुतार एन. एस, प्रा. गार्डी ए. जी, प्रा भालेकर एस. व्ही, प्रा. दळवे एस. ए , प्रा.साबळे एस .एन, प्रा. पाटील एस. एन, प्रा. वाकळे ए. जी, व महाविद्यालयाचे व्यवस्थापक घाडगे एच. एस या सर्वांनी विद्यार्थ्यांना वेळोवेळी उपक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले.

 
Top