धाराशिव / प्रतिनिधी-

 खरीप २०२२ मधील पंचनामे न झालेल्या शेतकऱ्यांना त्या महसूल मंडळात दिलेल्या नुकसानीची सरासरी काढून त्याप्रमाणे विमा देण्याचे विमा कंपनीने मान्य केले असून केंद्र सरकार कडील हप्त्याची रक्कम उपलब्ध होताच या शेतकऱ्यांना विमा वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील   यांनी दिली आहे.

 खरीप २०२२ मधील पिकांच्या नुकसानीपोटी धाराशिव जिल्हयातील अनेक शेतकरी अजुनही पीक विम्यापासुन वंचित असुन पंचनाम्याच्या प्रती अद्याप उपलब्ध करुन देण्यात आलेल्या नाहीत. तसेच नुकसान भरपाईमध्ये केलेली ५०% नियमबाह्य कपात व पंचनामे न केलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई बाबत वीमा कंपनीकडुन कार्यवाही होत नसल्यामुळे काल दि.२८ फेब्रुवारी २०२३ रोजी आ.राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी भारतीय कृषी वीमा कंपनीच्या मुंबई येथील कार्यालयात जाऊन विभागीय व्यवस्थापक श्रीमती शकुंतला शेट्टी यांची भेट घेवून चर्चा केली.

 जिल्हयातील ५८९२२६ शेतकऱ्यांनी नुकसानीच्या अधिसुचना वीमा कंपनीकडे केल्या होत्या, मात्र यातील १ लाख ३४ हजार सुचना वीमा कंपनीने नियमबाह्यरित्या नाकारल्या आहेत. तर अनेक शेतकऱ्यांना अत्यल्प पीकविमा मिळाला आहे. अनेक शेतकऱ्यांचे तर पंचनामेच करण्यात आले नाहीत. ही अत्यंत गंभीर बाब असुन पंचनामे न झालेल्या शेतकऱ्यांना अनुज्ञेय नुकसान भरपाई वितरित करण्यासह पंचनाम्याच्या प्रती लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे तसेच चुकीचे निकष लावून नुकसानीच्या टक्केवारीत केलेली ५० % ची कपात रद्द करून प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीप्रमाणे सुधारित नुकसान भरपाई वितरीत करण्याच्या सुचना आ.राणाजगजितसिंह पाटील  यांनी वीमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना केल्या.

 यावर भारतीय कृषी विमा कंपनीच्या विभागीय व्यवस्थापक श्रीमती शकुंतला शेट्टी यांनी नुकसानीच्या पूर्वसूचना दिलेल्या ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले नाहीत, अशा शेतकऱ्यांना त्या महसूल मंडळात दिलेल्या नुकसानीची सरासरी काढून त्याप्रमाणे विमा देण्याचे मान्य केले असून पंचनामे जमा करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगितले. तसेच केंद्र सरकारकडील हप्त्याची रक्कम प्राप्त होताच पंचनामे न झालेल्या शेतकऱ्यांना पिक विमा वितरीत करण्याचे मान्य केले आहे. १ ऑक्टोबर पासून जिल्ह्यात पिक कापणी प्रयोग सुरु झाल्याचे कारण देत नुकसानीच्या टक्केवारीत ५० % भारांकण लावून निश्चित केलेल्या नुकसान भरपाई बाबत वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. सर्व शेतकऱ्यांना हक्काची नुकसान भरपाई मिळेपर्यंत हा पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे आ. राणाजगजितसिंह पाटील  यांनी सांगितले आहे.


 
Top