उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शेतक-यांना पारंपरिक शेतीसोबत पर्यायी व्यवसाय किंवा जोडधंदा करणे काळाची गरज बनली आहे. आपण बघतो की शेतीचे तंत्रज्ञानही बदलत चालले आहे म्हणून प्रगतशील शेतकरी होण्यासाठी काळानुरुप बदल स्वीकारणे अत्यंत गरजेचे बनले आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी आज तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल येथे श्री तुळजाभवानी जिल्हा कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केले.

 यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रहुल गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर,आत्माचे प्रकल्प संचालक जितेंद्र शिंदे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महेश तिर्थकर आदी उपस्थित होते.

 डॉ.ओम्बासे म्हणाले, 2023 हा आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून जगभरात साजरा केला जात आहे. . तृण धान्याचे आहारात खूप महत्व आहे. उत्तम आरोग्यासाठी तृण  धान्याचा आहारात वापर वाढवा. आधुनिक जीवनशैलीनुसार मानवाच्या दैनंदिन आहारात बदल झाला आहे. या बदलत्या आहारामुळे शरीरास आवश्यक पोषक तत्त्वांची उणीव भरुन काढून होणाऱ्या आजारांवर मात करण्याची गरज निर्माण झाली आहे.  ही समस्या सोडविण्यासाठी पांरपरिक आहाराला चालना देवून सर्वसामान्यांना आरोग्यसंपन्न जीवन जगता यावे यासाठी शासनाने पौष्टिक तृणधान्याचा आहारात वापर वाढविण्याचा अभिनव कार्यक्रम हाती घेतला आहे. भविष्यातील सुदृढ व आरोग्यदायी समाजासाठी प्रत्येकानेच या कार्यक्रमाचा भाग होवून पौष्टिक तृणधान्यांचा आहारात नियमित वापर करावा.

 अल्पभुधारक शेतक-यांनी कुक्कुट पालन, तुतीलागवड, रेशीम व इतर नाविन्यपूर्ण व्यवसाय सुरु करावा, गेल्या काही वर्षांमध्ये दुष्काळ आणि अतिवृष्टी मुळे मुख्य पीकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्त्यांचा सामना करतांना जोडधंदा असल्यास आपला आर्थिक चक्र चालू राहते व दैनंदिन जीवनमानही स्थिर राहतो.असेही डॉ.ओम्बासे म्हणाले.

 दि.10 ते 14 फेब्रुवारी 2023 हे पाच दिवस कृषि महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.कृषि महोत्सव सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रत्येक विभागाने यामध्ये सक्रीय सहभाग घेतला आहे. या कृषि प्रदर्शनामध्ये शासनाचे विविध विभागांचे स्टॉल उभाराण्यात आले असून विभागांच्या योजनांची शेतकऱ्यांना परिपूर्ण माहिती प्रात्यक्षिकाव्दारे (live sample/demonstration) देण्यात येत आहे तसेच भेट देणाऱ्या शेतक-यांना आपल्या विभागाचा जास्ती जास्त प्रत्यक्ष लाभ देता येईल याचे नियोजन करण्यासाठी तसेच भेट देणाऱ्या शेतकऱ्यांमधून आपल्या विभागाच्या योजनांची गरज असलेले लाभार्थ्यांची तालुकानिहाय नोंदी ठेवल्या जात आहेत.  याचा सर्व शेतकरी बांधव आणि नागरिकांनी लाभ घ्यावायावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनीही उपस्थितांचे मार्गदर्शन केले.

शेतकऱ्यांच्या नावाने कार्यक्रम घेता किमान शेतकऱ्यांना तरी माहिती द्या -बोंदर

लाखो रुपये खर्चुन शेतकऱ्यांच्या नावाने कृषी प्रदर्शन भरवता किमान त्या कृषी प्रदर्शनाची माहिती शेतकऱ्यांना तरी द्या, अशी प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष रामजींवन बोंदर यांनी प्रतिनिधी बोलताना दिली. फक्त एक प्रेसनोट काढून अशा मोठ्या प्रदर्शनाचा गाजावाजा होत नसतो, त्यासाठी पत्रकार परिषद घेऊन कृषी विषयक कोणत्या उद्योगाचे स्टॉल येणार आहेत, कृषीवर प्रक्रिया करणारे कोणते लघुउद्योगाचे स्टॉल येणार आहेत. याची मािहती पत्रकार परिषद घेऊन देणे महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात दवंडी देऊन शेतकऱ्यांना कृषी प्रदर्शन पाहण्यास येण्याचे आवाहन करने अपेक्षीत होते, परंतु तसे झाले नाही. पीक विम्याबाबत कृषी विभागाची कर्तबगारी माहिती आहे, त्यामुळे लाखो रुपये खर्चुन घेण्यात येत असलेले हे प्रदर्शन म्हणजे पैसे पाण्यात घातल्यासारखे आहे, अशी प्रतिक्रिया बोंदर यांनी व्यक्त केली.  
Top