तुळजापूर/ प्रतिनिधी- 

श्री.तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विविध प्रशासकीय , आस्थापना व शैक्षणिक गुणवत्ता ई . बाबींचा आढावा घेण्याकरीता गठीत करण्यात आलेल्या समिती अहवाला बाबत  विश्वस्तांची बैठक उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात जिलाधिकारी डाॅ.सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली  रविवार दि १३रोजी  संपन्न झाली.

श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान संचलित श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विविध प्रशासकीय आस्थापना व शैक्षणिक गुणवत्तावाढ विषयक बाबींमध्ये सुधारणा करणेसाठी डॉ . योगेश खरमाटे  उपविभागीय अधिकारी,उस्मानाबाद तथा विश्वस्त सदस्य श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती 

. सदरील समितीमध्ये डॉ . एन.बी.पासलकर , माजी संचालक , तंत्रशिक्षण संचलनालय , मुंबई , डॉ . बी . एन . चौधरी , प्राचार्य , सरदार पटेल ईन्स्टीटयुट ऑफ टेक्नॉलॉजी , मुंबई , डॉ . मुकूल सुतावणे संचालक , कॉलेज ऑफ इंजिनिअरींग , पुणे , प्रो . बी.जी. बिराजदार , कॉलेज ऑफ इंजिनिअरींग , पुणे , डॉ . किरण थोरात , शासकीय शेतकी महाविद्यालय , उस्मानाबाद सदस्य म्हणून या सर्वांचा समावेश होता .

 सदर बैठकीमध्ये महाविद्यालयासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीने सादर केलेला अहवाल सर्व विश्वस्त मंडळीनी मान्य केला व महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सदर अहवालाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले . सदर अहवालाच्या अनुषंगाने महाविद्यालयातील गुणवत्ता वाढीसाठी सर्व वर्गाच्या विद्यार्थ्यांना कॉलेज ऑफ इंजिनिअरींग , पुणे व सरदार पटेल ईन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी येथील तज्ञ प्राध्यापकांच्या सहकार्याने अध्यापनाचे कार्य सुरू करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे तसेच महाविद्यालयाची पुढील शैक्षणिक वाटचाल समितीने सुचविलेल्या दोन महाविद्यालयांच्या मार्गदर्शनाखाली करण्याचे सर्वानुमते ठरविले . बोर्ड ऑफ गव्हर्नन्स ची महाविद्यालयात स्थापना करून महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांचे 100 % प्लेसमेंट करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले . श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासन हस्तांतरीत करण्याबाबत   राणाजगजितसिंह पाटील , आमदार तथा विश्वस्त यांचेसह सर्व विश्वस्त व समिती सदस्यांनी सकारात्मक चर्चा करून सदर कार्यवाही लवकरात लवकर पुर्णत्वास नेणेबाबत सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील असे सांगीतले . चालू शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी महाविद्यालयात प्रथमवर्ष अभियांकित्रीला मागील वर्षाच्या तुलनेत विद्यार्थ्यांचे प्रवेश दुप्पट संख्येने वाढले आहेत . बैठकीस उपस्थित सर्व विश्वस्त व समिती सदस्यांचे आभार श्रीमती योगिता कोल्हे , तहसिलदार तथा व्यवस्थापक ( प्रशासन ) , श्री . तुळजाभवानी मंदीर संस्थान , तुळजापूर यांनी मानले .


 
Top