उस्मानाबाद / प्रतिनिधी-  

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत भागभांडवली अंशदानाचे निधीतून 25 हजार रुपये पर्यंत प्रकल्प मर्यादा असलेली थेट कर्ज योजना राबविण्यात येत होती. या योजनेमध्ये शासन निर्णयान्वये बदल करण्यात आला आहे. महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या थेट कर्ज योजनेच्या कर्जाची मर्यादा 25 हजार रुपयां वरुन एक लाख रुपयां पर्यत वाढविण्यात आली आहे.

 ही योजना मातंग समाज आणि तत्सम 12 पोटजातीतील व्यक्तीकरिता राबविण्यात येत आहे. मांग, मातंग, मिनी मादिग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी आणि मादगी या पोटजाती समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

 2022-23 या आर्थिक वर्षासाठी थेट कर्ज योजनेंतर्गत महामंडळाने निश्चित केलेल्या जिल्हानिहाय भौतिक आणि आर्थि‍क उद्दिष्टे ठरविण्यात आली आहेत. तसेच या कार्यालयाच्या दि.14 नोव्हेंबर 2022 च्या  परिपत्रकामध्ये  नमूद केलेल्या सर्व अटी-शर्तींचे तंतोतंत पालन करुन देण्यात आलेल्या थेट कर्ज योजनेचे आर्थिक उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण करावे. असे मुख्यालयाचे आदेश आहेत.

 ही योजना महामंडळाच्या भागभांडवली अंशदानाच्या निधीतून राबविण्यात येत आहे. ही योजना जिल्ह्यातील ग्रामीण भागापर्यंत आणि गरजू पर्यंत पोहचण्याकरिता दि28 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर 2022 पर्यंत कर्ज मागणी अर्ज वितरीत करणे आणि याच कालावधीत कर्ज मागणी अर्ज स्विकारणे असा कालब्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. या कालावधी नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (म.) चे जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.

 
Top