उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जि.प.च्या कृषी विभागामार्फत 2022-23 मध्ये शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणे, यामध्ये कंपनीची नोंदणी आणि कार्यालय स्थापन करणे याकरिता अनुदान देण्यात येणार आहे. विविध शासकीय विभागांच्या योजनांचा शेतक-यांना शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत लाभ घेण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. कंपनींना वेळोवेळी कृषी विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात येईल. या योजनेतंर्गत जिल्हयामध्ये प्रति जिल्हा परिषद मतदार संघामध्ये एक याप्रमाणे 55 शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याचा लक्षांक निश्चित करण्यात आला आहे.

  या योजने करीता जिल्हा परिषद गटातील इच्छूक शेतक-यांनी पंचायत समिती कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी (कृषी) यांच्याकडे अर्ज सादर करावेत. या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 ऑगस्ट 2022 पर्यंत राहिल. या योजनेचा जास्तीत जास्त शेतक-यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जि.प.चे कृषी  विकास अधिकारी यांनी केले आहे.

 अटी व शर्ती :-शेतकरी उत्पादक कंपनीतील सर्व शेतकरी हे एकाच जि.प. मतदारसंघातल्या गावातील असावीत. कंपनीच्या संचालक मंडळात एक महिला शेतकरी असावी. एका जिल्हा परिषद गटामध्ये एकाच कंपनीस अनुदान देय राहील.कंपनीच्या नावात जि.प. असा उल्लेख बंधनकारक असेल.नोंदणी प्रमाणपत्र व कार्यालय स्थापन केल्यानंतरच अनुदान देय राहील.पंचायत समिती कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी (कृषी) अर्जाची छाननी करून निवड झाल्यानंतर नोंदणीसाठी कळवतील.पूर्वसंमती प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीनंतर व कार्यालय स्थापन झाल्यानंतर अनुदान वितरीत करण्यात येईल.जे प्रथम अर्ज सादर करतील त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.निवडीचे अंतिम अधिकार पंचायत समिती कृषी अधिकारी सामान्य यांना राहतील.जर कागदपत्रांची पूर्तता व नोंदणी फिस वेळेत सादर न केल्यास प्रतिक्षाधिन यादीतील व्दितीय क्रमांकावरील अर्जाचा विचार करण्यात येईल.पूर्वसंमती न घेता नोंदणी केलेल्या कंपनीस अनुदान देण्यात येणार नाही.मुदत संपल्यानंतर अर्ज सादर केल्यास सदर अर्जाचा विचार होणार नाही.

 या योजनेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या तालूक्याच्या पंचायत समिती कार्यालयातील कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी (कृषी) यांच्याशी संपर्क साधावा.

 
Top