उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 लोकसभेच्या शुन्य प्रहाराच्या काळात EPS 95 पेंशन धारकांना दरमहा 7500 रक्कम, महागाई भत्ता व मोफत वैद्यकीय सुविधा मिळाव्यात याबाबत सभागृहाच्या माध्यमातून खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मागणी केली. 

संपुर्ण देशात EPS 95 संघटनेद्वारे त्यांच्या न्याय मागणीसाठी वारंवार आंदोलने करण्यात येत आहेत. तसेच जिल्ह्यातील EPS 95 पेंशनधारक संघटनेच्या वतीने सदर प्रश्नामध्ये लक्ष घालण्याची विनंती मा. खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना केली होती. या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेता देशातील EPS 95 पेंशनधारकांची संख्या ही 70 लाखाच्या जवळपास असून देशातील एकुण 187 उद्योगातील (केंद्र व राज्य सरकार अंतर्गत व्यवसायासह) 9 कोटी कर्मचारी हे EPS 95 चे सभासद आहेत. सेवानिवृत्त कर्मचारी यांचे सेवाकाळात दरमहा रु. 417/541/1250 इतकी रक्कम कपात झालेली असताना EPS 95 पेंशनधारकांना अत्यल्प प्रमाणात साधारणत: 500 रु ते 2500 रुपयांपर्यंतची पेंशन देण्यात येत आहे. सदर मंजूर झालेली पेंशन ही सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पगारीतून कपात झालेल्या रकमेच्या तुलनेत अत्यल्प आहे. सद्याच्या महागाईच्या काळामध्ये 500 ते 2500 रु पेंशनधारक हे या रकमेतून त्यांचे आजारपण व त्यांचा राहण्याचा खर्च भागू शकत नाही. या संदर्भामध्ये कोश्यारी समितीची स्थापना करण्यात आली होती. कोश्यारी समितीने मागच्या 8 वर्षापुर्वी शिफारस केली की 7500 हजार रु रक्कम व महागाई भत्ता दरमहा EPS 95 पेंशनधारकांना देण्यात यावा. परंतु अद्यापपर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नाही. कोश्यारी समितीच्या सर्व शिफारशी मान्य करण्याबाबत तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाच्या दि. 04/10/2016 रोजीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची विनंती खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी लोकसभेच्या शुन्य प्रहाराच्या माध्यमातून बोलताना केली.

 
Top