उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  रस्ते विशेष दुरूस्ती कार्यक्रमाअंतर्गत कळंब- मोहा- येडशी या रस्त्याची आणि जिल्हा सरहद्द ते बहुला- इटकूर- मांडवा- बावी- तेरखेडा- कडकनाथवाडी रस्त्याची सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी निधी मिळावा म्हणून उस्मानाबाद- कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांनी पाठपुरावा केला होता. 

रस्ते व पूल परिक्षण व दुरूस्ती कार्यक्रम 2021- 22 अंतर्गत विशेष रस्ते दुरूस्ती कार्यक्रमाअंतर्गत राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या दोन्ही रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी 10 कोटींचा निधी मंजूर केल्याचे पत्र 16 फेब्रुवारी रोजी मुख्य अभियंत्यांना दिले आहे. कळंब- मोहा- येडशी हा वर्दळीचा मार्ग आहे. मोहासह परिसरातील सातेफळ, वाघोली, हळदगाव आदी गावांतील नागरिकांना कळंब व उस्मानाबाद येण्या- जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गाची ठिकठिकाणी दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांची तात्पुरती दुरूस्ती केली जायची. या रस्त्याची दर्जेदार दुरूस्ती व्हावी, खड्ड्यांपासून वाहनचालकांचा त्रास कमी व्हावा, नागरिकांची गैरसोय दूर व्हावी, यासाठी आमदार कैलास घाडगे पाटील यांनी यांनी रस्त्याच्या दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. आमदार घाडगे – पाटील यांच्या प्रयत्नामुळे या रस्त्याच्या सुधारणासाठी 850 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

जिल्हा सरहद्द ते बहुला- इटकूर – मांडवा- बावी- तेरखेडा ते कडकनाथवाडी या रस्त्याच्या सुधारणेसाठीही 150 लाख रुपयांचा निधी राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूर केला आहे. मंजुरीचे तसे पत्रही दिले आहे. या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी निधी मिळावा म्हणून आमदार कैलास घाडगे- पाटील यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला होता. आमदार पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, या दोन्ही रस्त्यांच्या कामांसाठी 10 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

 
Top