ढाेकी येथील जामा मस्जिद इनामी जमीन बेकायदेशीर खरेदी प्रकरण

उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तालुक्यातील ढोकी येथील जामा मस्जिद मालकीच्या इनामी जमीन खरेदी फेरफार क्रं.७९५ रद्दचा उपविभागीय अधिकारी यांचा निर्णय अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी कायम ठेवत इनामी जमीन खरेदीदार बुऱ्हानोद्दीन काझी यांचे अपील नामंजूर केले आहे.

जामा मस्जिद देवस्थान मालकीची इनामी जमीन गट नंबर ९६ क्षेत्र २१ हेक्टर ६१ आर ही वक्फ अधिनियम १९९५ कलम ३६ नुसार वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत आहे. तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र २७ मार्च १९८० चैत्र ७, १९०२ यास संबंधित इनाम जमिनीची नोंदी आहेत. असे असतानाही ढोकी येथील बुऱ्हानोद्दीन काझी यांनी तत्कालीन तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याशी संगनमत करून वक्फ बोर्ड अथवा शासनाची पूर्वपरवानगी न घेता इनामी जमीन बेकायदेशीर पणे स्वतःच्या नावे करून घेतली होती.या प्रकरणात बेकायदेशीर खरेदी झाल्याचे लक्षात आल्यानंतर सदरील इनामी जमिनीचे वंश परंपरागत इनामदार असलेले वाजीद खुद्दुस काझी यांनी इनामी जमीन खरेदी फेरफार क्र.७९५ रद्द करून जमीन जामा मस्जिदच्या नावे करणेबाबत उपविभागीय अधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे अपील दाखल केले होते. उपविभागीय अधिकारी यांनी १९/०८/२०१९ रोजी बेकायदेशीर खरेदी फेरफार रद्द केले. इनामी जमिनीचे बेकायदेशीर खरेदी विक्री झालेली असल्याने संबंधितांविरुद्ध आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी असे जिल्हा वक्फ अधिकारी यांना आदेशित केले होते. तसेच तहसीलदार यांना जामा मस्जिद संदर्भात जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण व्यवहार झालेले असतील तर त्याबाबत सखोल चौकशी करून अशी प्रकरणे शासन परिपत्रक क्र.डिईव्ही-२०१५/प्र.क्र.१५१ ज-१अ ०६ नोव्हेंबर २०१८ अन्वये दाखल करण्यात यावीत असे आदेशित केले होते. या निर्णयाविरोधात जमीन खरेदीदार बुऱ्हानोद्दीन काझी यांनी अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दाखल केले होते. अप्पर जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात प्रकरणाची सुनावणी झाली. सदर जमीन ही वक्फ प्रॉपर्टी असल्यामुळे जमीन कोणालाही हस्तांतरित करता येत नाही, असे सांगत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांचे आदेश कायम ठेवले आहे.


 
Top