उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महसूल  व  कृषी  विभागाच्‍या  संयुक्‍त‍ विद्यमाने ई-पीक पाहणी हा पथदर्शी कार्यक्रम 15 ऑगस्ट 2021 पासून सुरु झाला आहे.  यामध्‍ये शेतकरी बांधवांना स्‍वतःचे शेतामधील पीकांची पीक पाहणी करण्‍याचा अधिकार याव्‍दारे शासनाने दिलेला आहे. या प्रकल्‍पाव्‍दारे नैसर्गिक आपत्‍ती नुकसान भरपाई, पीकविमा योजना भरपाई, पिएमकिसान योजना लाभ, पीककर्ज वाटप तसेच कृषी विभागाच्‍या सर्व योजनांच्‍या लाभासाठी याचा वापर करण्‍यात येणार आहे.

शेतक-यांना मोबाईल प्‍ले स्‍टोअर वरुन ई-पीक पाहणी हे अॅप डाऊनलोड करुन आपल्या खरीप, रब्‍बी व बहूवार्षीक पीकांचा पीकपेरा स्‍वतःला भरता येणार आहे. यासाठी आपला गट क्रमांक किंवा नाव किंवा खाते क्रमांक याव्‍दारे आपली माहिती भरुन नोंदणी करावी लागणार आहे. एकदा नोंदणी करुन आपल्‍या शेतामध्‍ये या अॅप च्‍या माध्‍यमातून जीपीएस असलेला फोटो अपलोड करुन आपली पीक पाहणी पूर्ण करता येणार आहे. यासाठी शासनाने खरीप 2021 करीता शेतक-यांना पीक पाहणी भरण्‍यासाठी दि. 15सप्टेंबर 2021 पर्यंत मुदत दिलेली आहे.

सर्व शेतकरी बांधवानी याचा लाभ घ्‍यावा. शेतक-यांनी एकदा पीक पाहणी माहिती भरल्‍यानंतर पीकांमध्‍ये कोणताही बदल करता येणार नाही. सबब शेतक-यांनी काळजीपूर्वक आपले पीक आणि त्‍याच्या क्षेत्राची माहिती भरावी. पीक पाहणी करताना काही अडचण आल्‍यास आपल्‍या गावचे तलाठी किंवा कृषी सहायक यांच्‍याशी संपर्क साधावा. तसेच पीक पाहणीबाबत सर्व शेतकरी बांधवांना याची माहिती करुन देण्‍यात यावी, असे आवाहन उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी यांनी केले आहे.

 
Top