उमरगा  / प्रतिनिधी-

तालुक्यातील डोंगराळ भागात व वनसंपदेने संपन्न अश्या भागात वसलेल्या मळगीवाडी येथे दतात्रय व्यंकट औरादे याचा शेतात शुक्रवारी दि.20 रोजी भारतीय अजगर प्रजातीचे साडेसात फुटाचे नर जातीचे अजगर आढळून आले.त्यास सर्पमित्राच्या सहाय्याने पकडून वनविभागाकडे सोपविण्यात आले.

 उमरगा तालुक्यातील कर्नाटक सीमेलगतचा भाग डोंगराळ व जैवविविधता आढळून येणारा आहे.याच भागात वसलेल्या मळगीवाडी या गावातील शिवारात दत्तात्रय औरादे यांच्या शेतात शुक्रवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास साडेसात फुटाचे नर अजगर आढळून आले.यावेळी येथील काहीं तरुणांनी उमरगा शहरातील शिवराज गायकवाड या सर्पमित्रास संपर्क साधून अजगर सापडल्याची माहिती दिल्यानंतर सर्पमित्र शिवराज गायकवाड व अतुल चव्हाण,चैतन्य पांचाळ,युवराज गायकवाड,निसार मुल्ला,इमरान शेख यांनी शेतात जाऊन मोठ्या शिताफीने या अजगरास पकडले व वनविभागास याची खबर देऊन उमरगा येथील वनविभागाच्या कार्यालयात या अजगरास सुपूर्द केले.यावेळी वनविभागाचे वनरक्षक तुकाराम डिगोळे यांनी हा अजगर ताब्यात घेतला व नंतर या अजगरास सायंकाळी ज्या भागात पकडले होते त्यालगत असलेल्या वनविभागाच्या धाकटेवाडीच्या जंगलात त्याला सोडून देण्यात आले.कर्नाटक सीमेलगत उमरगा तालुक्याच्या हद्दीत डोंगराळ भागात वन्यजीवाचा मोठा वावर सातत्याने आढळून आलेला आहे.पण वनविभागाचे होणारे दुर्लक्ष यामुळे याभागात शिकारीचे प्रमाण मोठे आहे. या भागात घोरपड, साप, अजगर,ससे, हरणे, मोर,कोल्हे व इतर वन्यजीव असल्याचे आढळून आले आहे.तरी वनविभागाने या भागात या जीवाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करून शिकारीवर आळा घालण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी वन्यजीव प्रेमीतून होत आहे.

 
Top