उस्मानाबाद / प्रतिनिधी-

अटल भूजल अर्थात अटल जल योजनेंतर्गत राज्यातील भूजल क्षेत्रातील सुधारणांच्या अनुषंगाने भूजल साक्षरता वाढविण्यासाठी चित्ररथ जिल्हयात दाखल झाली आहे.भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतर्फे या चित्ररथाची निर्मिती करण्यात आली आहे.उस्मानाबाद जिल्हयातील तामलवाडी (ता.तुळजापूर )येथून या चित्ररथाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली आहे.

 राज्यातील भूजल क्षेत्रात सुधारणा करण्याच्या उद्देशाने भूजलाची गुणवत्ता आणि उपलब्धता सुधारण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत अटल भूजल (अटल जल)योजना राज्यातील 13 जिल्हयांमधील 73 पाणलोट क्षेत्रातील 1339 ग्रामपंचायतींमधील 1443 गावांमध्ये राबविण्यात येणार आहे.पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागा यांच्या शासन निर्णय दि.26 नोव्हेंबर 2020 नुसार योजनेचे नियोजन,अटी,शर्ती,योजनांची आखणी,प्रशासकीय यंत्रणा इत्यादी बाबीची माहिती अंतभूत करण्यात आली आहे.या योजनांतर्गत जिल्हयातील उस्मानाबाद तालुका 50 गावे व उमरगा तालुका 05 गावे अशा एकूण 55 गावांचा समावेश करण्यात आहे.

 या कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी भूजल सर्वेक्षणचे संचालक डॉ.मल्लिनाथ कलशेटटी यांच्यामार्फत भूजल साक्षरता चित्ररथाद्वारे प्रबोधन करण्यात येत आहे.या चित्ररथाचे सोलापूर जिल्हयातून तामलवाडी (ता.तुळजापूर) ग्रामपंचायत सरपंच श्रीमती गवळी आणि इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हस्तांरण करुन उस्मानाबाद जिल्हयामध्ये दीपकनगर तांडा (ता.उस्मानाबाद) येथे चित्ररथ फिरविण्यात आला आहे.दि.17 ऑगस्ट 2021 रोजी या चित्ररथाचे आगमन झाले आहे.      

  चित्ररथाच्या आगमनावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती अस्मिता कांबळे यांच्या हस्ते रिबीन कापून आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता (भाप्रसे) यांनी हिरवा झेंडा दाखवून चित्ररथाचे संचलन केले.यावेळी सभापती महिला व बाल कल्याण विभागाच्या सभापती  श्रीमती टेकाळे, सहा.भूवैज्ञानिक एस.बी गायकवाड,कनिष्ठ भूवैज्ञानिक अमित जिरंगे, ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, कार्यकारी अभियंता डी.आर.देवकर,भूवैज्ञानिक श्रीमती शुभांगी गुरवे,श्रीमती मनिषा डोंगरे,तसेच पाणी व स्वच्छता कक्ष,जिल्हा परिषद येथील श्री. गादगे,श्री.मिसाळ आदी उपस्थित होते. 

 
Top