उस्मानाबाद/ प्रतिनिधी

तालुक्यातील तेर येथील तेरणा धरणात परराज्यातील लोकांना मासेमारी करण्याचा परवाना दिला असून तो रद्द करावा. तेर परिसरातील भूमिपुत्र असलेल्या मच्छीमारी करणाऱ्या लोकांना मासेमारीचा परवाना द्यावा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारपासून (दि.२४) उपोषण सुरु करण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उस्मानाबाद तालुक्यातील गोवर्धनवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्यादित गोवर्धनवाडी व तेरणा मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्यादित कोळेवाडी या दोन संस्थांना शासनाने तलाव ठेका दिला आहे. संस्थेचे चेअरमन नंदू मारुती शिंदे हे २० वर्षापासून पुणे येथे राहतात. तर तेरणा मत्स्य व्यवसाय सह. संस्थेचे चेअरमन देवकन्या राजेंद्र राऊत या गेल्या १० वर्षापासून पंढरपूर येथे राहत आहेत. संस्थेचा पूर्ण कारभार त्यांचे नातेवाईक पाहतात. या दोन्ही संस्थेच्या सचिवांकडे आम्ही मासेमारी परवान्यासाठी अर्ज केला असता अर्ज घेण्यास टाळाटाळ करत आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही संस्थेच्या नातेवाइकांनी आम्ही चोरून मासेमारी करतो, असे खोटे गुन्हे दाखल केले आहेत. आम्हाला मासेमारी करण्यासाठी परवाना द्यावा, यासाठी सहाय्यक आयुक्त (मत्स्य व्यवसाय) यांच्याकडे वारंवार विनंती अर्ज करुन मागणी केली व करत आहोत. परंतु त्यांनी अर्जाची दखल घेतली नाही. त्यामुळे २४ जूनपासून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलो आहोत. उपोषणात बालाजी हरिश्‍चंद्र माने, सचिन माणिक माने, अविनाश बालाजी माने, अमर विष्णू माने, सूरज सोमनाथ जाधव, तानाजी लिंबाजी माने, नंदू लिंबाजी माने, अभिषेक बालाजी माने, खंडू विश्‍वनाथ जामकर, बालाजी गोरख शिंदे, ब्रह्मचारी संदीपान खोत, काकासाहेब खोत व सागर सीताराम माने या मच्छीमारी करणारे सहभागी झाले आहेत.


 
Top