उस्मानाबाद / प्रतिनिधी-

काही खत उत्पादक कंपन्यांनी खताचे दरवाढ केल्याच्या बातम्या विविध माध्यमातून प्रसारित झालेल्या आहेत. खत पुरवठा करणा-या कंपन्यांचे दर ग्रेडनिहाय वेगवेगळे आहेत.विक्रेत्याकडे जुना व नवीन दोन्ही प्रकारचा रासायनिक खत साठा आहे.विक्रेत्याने जुना शिल्लक खत साठा हा पूर्वीच्याच एम.आर.पी प्रमाणे विकने बंधनकारक आहे. त्यामुळे शेतक-यांनी रासायनिक खताची खरेदी करताना विक्रेत्याकडे ई-पॉस मशिनवरील बिलाचा आग्रह करावा, कारण यावर जुन्या साठयाचे दर जुन्या दराप्रमाणे येतात.खरेदी केलेल्या खताची पक्की पावती घ्यावी.

  तसेच खरेदी केलेल्या पोत्यावरील खताची एमआरपी व विक्रेत्याने दिलेले ई-पॉस/पक्के बिल तपासून घ्यावे. यासंबधी काही अडचण,तक्रार असल्यास तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी अधिकारी, पंचायत समिती तसेच जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी किंवा कृषी विकास अधिकारी, जि.प यांचेकडे संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

 ग्रामपंचायत स्तरावर जमीन सुपिकता निर्देशांकाचे फलक लावण्यात आले आहेत. त्यानुसार क्षेत्रीय स्तरावरील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक यांचे मार्गदर्शन घेऊन जमीन सुपिकता निर्देशांकानूसार रासायनिक खताचा संतुलित वापर करावा.रासायनिक खताबरोबर शेणखत,हिरवळीचे खत,लिंबोळी पेंड,जैविक खते जसे रायझोबियम,पीएसबी,अझॅटोबॅक्टर यांचा वापर केल्यास रासायनिक खताची कार्यक्षमता वाढून पर्यायाने खताचा वापर व खर्चात बचत करता येते. यासाठी निव्वळ रासायनिक खते न वापरता रासायनिक खताबरोबर सेंद्रीय खतांचाही वापर करुन रासायनिक खताचा वापर कमी करावा असे केल्यास उत्पादन खर्चात बचत होऊन निव्वळ उत्पन्न वाढण्यास मदत होईल.

 अधिक माहितीसाठी आपल्या गावच्या कृषी सहाय्य्क, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी  तसेच संबधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यु.आर.घाटगे  यांनी केले आहे.

 
Top