उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

उस्मानाबाद जिल्हयातील विधिज्ञ व न्यायिक अधिकारी यांना कोविड-१९ प्रतिबंधित लस देण्याची मागणी  जिल्हा विधिज्ञ, मंडळ, उस्मानाबाद च्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, उस्मानाबाद जिल्हा न्यायालयात दैनंदिन कोर्ट कामकाजाकरीता रोज ५०० ते ६०० विधिज्ञ येतात. त्याचप्रमाणे न्यायिक अधिकारी, कर्मचारी, पोलीस व पक्षकार ये-जा करत असतात. विधिज्ञ बांधवांना कोर्ट कामकाज करत असताना बहुतांश वेळा गर्दीत काम करावे लागते, तसेच पक्षकारांचा थेट संपर्क होतो. त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. भविष्यात संसर्ग जास्त होऊ नये म्हणून उस्मानाबाद जिल्हयातील संपूर्ण न्यायिक वर्ग व विधिज्ञांना कोविड-१९ प्रतिबंधक लस देणे गरजेचे आहे. कारण विधिज्ञ बांधव पण फ्रंटलाईन वर्करप्रमाणे काम करत आहेत. तरी न्यायदान प्रक्रीयेतील महत्वाचा घटक म्हणून तसेच गर्दीशी येणारा संपर्क अशा सर्व बाबींचा विचार करुन विधिज्ञ वर्ग व त्यांच्या कुटूंबियांना तातडीने लस उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅड. नितीन भोसले यांची स्वाक्षरी आहे. 

 
Top