उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा स्त्री रुग्णालय, जिल्हा स्त्रीरोग संघटना ,इंडियन मेडिकल असोसिएशन (लेडीज विंग)  यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी गर्भाशय मुखाचा  आणि स्तनाचा कॅन्सर तपासणी शिबिराचे आज आयोजन करण्यात आले होते.

 जिल्हा स्त्री रुग्णालयात  आज कर्करोग तपासणी शिबिरास प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय  पाटील, इंडियन मेडिकल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉ. सचिन देशमुख, जिल्हा स्त्रीरोग संघटना जिल्हाध्यक्ष डॉ. अनुराधा  गरड, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्मिता गवळी, डॉ. मीना जिंतूरकर, डॉ. आदिनाथ राजगुरू, डॉ. ललिता स्वामी, डॉ.श्रद्धा मुळे, डॉ.टिके, डॉ. शैलजा मिटकरी यांची उपस्थिती होती.

 यावेळी डॉ धनंजय पाटील, डॉ अनुराधा गरड, डॉ सचिन देशमुख , डॉ स्मिता गवळी यांनी महिलांना मार्गदर्शन केले. समाजामध्ये बदललेल्या जीवनशैलीमुळे सर्वत्रच  गर्भाशय मुखाचा आणि स्तनाचा कॅन्सर होण्याची संख्या वाढत आहे. यात प्रामुख्याने जास्त प्रसूती होणे, पांढरा पदर जाणे ,लाल पदर जाणे, रक्तस्त्राव होणे तसेच स्तनांमध्ये गाठ आढळून येणे ही प्रमुख कारणे आहेत .अशा प्रकारची लक्षणे दिसून आल्यास नियमितपणे शारीरिक तपासणी करून घेणे आवश्यक आहे. योग्य वेळी कॅन्सरचे निदान झाल्यास गर्भाशयाचा व स्तनांचा कॅन्सर आपण टाळू शकतो.

 आज जिल्हा स्त्री रुग्णालयात 100 महिलांची तपासणी करण्यात आली. या तपासण्या 10 मार्च पर्यंत स्त्री रुग्णालयात करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी तपासणी करून घ्यावी असे आवाहन डॉ. स्मिता गवळी यांनी केले आहे.

 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संतोष पोतदार यांनी केले  तर आभार डॉ. शैलजा मिटकरी यांनी मानले. या कार्यक्रमात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्त्री रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

 
Top