उस्मानाबाद/ प्रतिनिधी

जिल्हयातील सर्व आरोग्य विषयक सेवा देणाऱ्या संस्थांनी त्यांच्याकडील आरोग्य संबंधीच्या खर्चासाठी केंद्र व राज्य शासनाने उपलब्ध करुन दिलेला निधी नियमांचे पालन करुन 31 मार्च 2021 च्या आत खर्च करावा.तसेच हा खर्च करताना जिल्हयात आरोग्य सेवेसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा निर्माण करण्यावर अधिक भर द्यावा,असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांनी आज येथे दिले.

 जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झाली,तेव्हा ते बोलत होते.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी श्रीमती रुपाली आवले होत्या.यावेळी जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही.वडगावे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.डी.के.पाटील,अपर पोलिस अधीक्षक संदीप पालवे,जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.निपाणीकर,जिल्हा कुष्टरोगाचे सहायक संचालक डॉ.रफिक अन्सारी,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.एम.आर.पांचाळ,जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.के.के.मिटकरी,डॉ.राजेश कुकडे,आदी उपस्थित होते.

  या बैठकीत कोरोना लसीकरणाबरोबरच विविध नऊ विषयांचा आढावा घेण्यात आला.कोरोना लसीकरणाबाबत माहिती देताना डॉ.वडगावे म्हणाले,जिल्हयात पाच ठिकाणी लसीकरणाची व्यवस्था करण्याचे शासनाचे निर्देश असताना जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या निर्देशानुसार जिल्हा शल्य चिकित्सकांनी  जिल्हयात नऊ ठिकाणी कोरोना लसीकरणासाठी व्यवस्था केल्याने लसीकरणाचे काम जिल्हयात उत्तम रित्या सुरु आहे.त्यामुळे या लसीकरणात उस्मानाबाद जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे.जिल्हयात कोव्हीशिडचे 24 हजार 150 डोस तर कॉव्हॅस्तीनचे सात हजार 120 डोस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.त्यामुळे जिल्हयात कोरोना लसीचे डोसचे पुरेसे डोस उपलब्ध आहेत,अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

 आरोग्य सेवा संबंधित काही अधिकारी –कर्मचाऱ्यांनी अद्याप लस घेतली नाही त्यांनी तातडीने ही लस द्यावी. ही लस अतिशय सुरक्षित असून देशात या लसीमुळे कोणाचाही मृत्यू

  झाला नाही किंवा कुणीही गंभीर आजार पडले नाही.त्यामुळे गैरसमज दूर ठेवून ज्या ज्या अधिकारी –कर्मचाऱ्यानी कोविन ॲपवर नोंद केली आहे आणि त्यांना कोरोनाची लस घेण्याचा संदेश मिळाला आहे.त्यांनी त्याच दिवशी लस घ्यावी.टाळाटाळ करु नये,असे आवाहन श्रीमती आवले यांनी यावेळी केले.

  पीसीपीएनडीटी कायद्याची जिल्हयात चोख अंमलबजावणी  करुन मुलींचा जन्म दर सुधारण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.जिल्हयात सध्या नोंदणीकृत 90 सोनोग्राफी केंद्र आहेत.त्यापैकी बंद असलेली 13 केंद्र आहेत,तर सुरु असलेली 77 केंद्र आहेत.या सर्व केंद्रांची वेळोवेळी तपासणी केली जाते.अवैधपणे लिंग निदान करण्यात येऊ नये,म्हणून लक्ष ठेवले जाते.यासाठी डिकॉय केसेसही केल्या जातात.जिल्हयात 20219-20 मध्ये 17 तर 2020-21 मध्ये दोन डिकॉय केसेस करण्यात आल्या आहेत. जिल्हयात मुलींचा जन्म दर वाढविण्यासाठी आणि लिंग निदार करुन गर्भपात करण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी अंगणवाडी सेविकांची मदत घ्यावी. खबऱ्यांची संख्या वाढवून त्यांचाही योग्य वापर करावा,अशी सूचना डॉ.फड यांनी यावेळी केली.

 आपत्कालीन रुग्ण सेवेअंतर्गत जिल्हयात 108 क्रमांकाच्या पंधरा रुग्णवाहिका आहेत.या रुग्णवाहिकांचा कोरोनाच्या काळात खूप चांगला उपयोग झाला.पण या रुग्णवाहिकांसाठी संबंधित कंपनीस डॉक्टर मिळत नसल्याने काही वेळा रुग्ण वाहिकेत डॉक्टर नसतात.पण बहुतेक वेळी या रुग्णवाहिकेत डॉक्टर उपलब्ध राहतील याची खबरदारी संबंधित कंपनीने घ्यावी,असे निर्देश डॉ.फड यांनी यावेळी दिले.तसेच कोरोनाने मृत्यू पावलेल्या व्यक्तींचे शव स्मशानात घेऊन जाण्यासाठी संबंधित नगर पालिका/परिषदांनी शव वाहिनी उपलब्ध करुन द्यावी,असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात येतील.असे श्रीमती आवले यांनी सांगितले.

 कोरोनाच्या साथीमुळे अंगणवाडी आणि शाळांतील मधील मुलींच्या आरोग्य तपासणीचे उपक्रम राबविता आले नाहीत पण यापुढे पुरेशी खबरदारी घेऊन हे काम करावे,असे यावेळी सांगण्यात आले. कायाकल्प योजनेचा जिल्हयातील जास्तीत जास्त रुग्णालयास लाभ होईल यासाठी प्रयत्न करावेत.राष्ट्रीय अंधत्वनिवारण कार्यक्रमांतर्गत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात यावे,मोफत चष्मांचे वाटप करण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण करुन घ्यावी,शाळांतील मुलांचीही डोळे तपासणी संपूर्ण खबरदारी घेऊन करण्याचा प्रयत्न करावा, क्षय रुग्णांबाबत आणि कुष्टरुगणांबाबत जिल्हयात चांगले काम केले जात आहे.त्यास आणखी गतीमान करावे,गेल्यावर्षभरात जिल्हयात किटकजन्य रोग आणि कोरोनाची साथ वगळता इतर साथ रोगांचा फारसा फैलाव झाला नाही,अशी माहिती यावेळी देण्यात आली. किशोरवयीन आरोग्य कार्यक्रमा अंतर्गत मैत्री क्लिनीकमधील किशोरवयीन मुला-मुलींची उपस्थिती,मासिक पाळीमधील स्वच्छते विषयक योजना,राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम,राष्ट्रीय असंसर्गरोग नियंत्रण कार्यक्रम,प्रधानमंत्री मातृ वंदन योजना,प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान आदी योजनांचाही यावेळी आढावा घेण्यात आला.

 
Top