उस्मानाबाद/ प्रतिनिधी

विभागीय आयुक्तांच्या आदेशानंतर जिल्हयात एक जानेवारी ते 28 फेब्रुवारी-2021 दरम्यान सुंदर माझे कार्यालयात उपक्रम राबवली जात आहे.या उपक्रमात आपले कार्यालय सुंदर आणि स्वच्छ करण्याबरोबरच आपल्या कार्यप्रणालीतही बदल करुन कार्यालयातील वातावरण प्रसन्न करण्यात यावे,असे प्रतीपादन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज येथे केले.

  सुंदर माझे कार्यालय अभियानाबाबत येथील मध्यवती प्रशासकीय इमारतीतील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात शहरातील सर्व जिल्हास्तरीय कार्यालय प्रमुखांची बैठक घेण्यात आली, तेव्हा ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड,अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले,निवासी उपजिल्हाधिकारी  शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) महेंद्रकुमार कांबळे आणि अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

 या अभियानाअंतर्गत कार्यालयीन स्वच्छता आणि अनुषांगिक बाबी,प्रशासकीय बाबी तसेच कर्मचा-यांच्या वैयक्तिक बाबींवर काम करावयाचे आहे. हा उपक्रम जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या सर्व कार्यालयांबरोबरच तालुका आणि त्यांच्या अधिनस्त  असलेल्या कार्यालयातही राबवावयाचा आहे, असे सांगून श्री.दिवेगावकर म्हणाले की, कार्यालयीन स्वच्छतेच्या अनुषंगाने कार्यालयातील अंर्तबाहय स्वच्छता,कर्मचा-यांच्या सहभागाने करणे अपेक्षित आहे.कार्यालयातील फर्निचरची दुरुस्ती करणे किंवा नवीन फर्निचर बसवणे,कार्यालयातील रचना आकर्षित करणे,आंर्तबाहय रंगरंगोटी करणे,स्वच्छता गृहांची स्वच्छता,वॉश बेसिनची स्वच्छता करणे,आवश्यकतेनुसार कचरा कुंडया ठेवणे,कर्मचा-यांना डस्टबीन देणे,कार्यालयात शोभिवंत झाडांच्या कुंडया ठेवणे, गणवेश,ओळखपत्र,नावाच्या पाटया,कामाचे विवरण ठेवणे. रेनवॉटर हावॉस्टिंग आणि सोलरचा वापर करणे,विजेच्या बचतेसाठी एलएडी बल्ब बसवणे, वृक्षारोपण करणे आदी बाबींना प्राधान्या द्यावे,असेही ते म्हणाले.

  प्रशासकीय बाबींअतर्गत अनेक गोष्टींची पूर्तता या अभियान कालखंडात करावयाच्या आहेत.त्यात प्रामुख्याने झीरो पेन्डसी,संचिका अद्ययावत करणे,अभिलेखांचे वर्गीकरण करणे,अभिलेख कक्षाचे अद्ययातीकरण करुन त्यांचे संगणीकरण करणे,जुन्या साहित्याचे,वस्तुंचे निर्लेखन करणे,संगणकाचा शंभर टक्के वापर करणे. सेवा हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे,आदी बाबींचा प्राधान्य द्यावे,असे सांगून श्री.दिवेगावकर म्हणाले की,आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याबरोबरच त्यांना देय असलेले लाभही वेळेवर द्यावेत. यात प्रामुख्याने स्थायीत्वाचा लाभ देणे, दुय्यम सेवा पुस्तक तयार करणे, ज्येष्ठता याद्या तयार करुन प्रसिध्द करणे,गोपनीय अभिलेखे वेळेवर  लिहिणे आणि त्यांचे जतन करणे,आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देणे,पदोन्नती देणे,बिंदु नामावली अद्ययावत करणे,भविष्य निर्वाह निधीची  स्लिप आदी आणि कामांना प्राधान्य द्यावे,असेही ते म्हणाले.

जिल्हयातील अधिकारी कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करुन त्यांना आरोग्य कार्ड देण्यासाठी आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी करावे,जुन्या वाहनांना रंगरंगोटी करुन त्यांचा वापर परिसराच्या सुशोभिकरणासाठी करावा,वृक्षा रोपनास प्राधान्य द्यावे,पार्किंगच्या जागा निश्चित कराव्यात. उस्मानाबाद जिल्हयातील अधिकारी/कर्मचाऱ्यांनी आपल्या गावाच्या विकासाची जबाबदारी घेऊन तेथे त्यासंबंधी कामे करावीत.आपण 24 तासांपैकी बहुतेक वेळ कार्यालयात  बसून काम करतो, ती जागा स्वच्छ आणि सुंदर राहावी, येथे काम करताना प्रसन्न वाटावे,यादृष्टीने रंगरंगोटी करावी.अशा सूचनाही श्री.दिवेगावकर यांनी यावेळी केल्या.

 आपल्यापैकी प्रत्येकाची समाजात एक प्रतिमा  असते,ती प्रतिमा मिळवण्याची  आपली जबाबदारी आहे.आपले कार्यालय स्वच्छ आणि सुंदर करण्याची सर्वांची त्यासाठी काळजी घ्यावी,कार्यालयातील सुधारणा करतांना त्याबाबी कायमस्वरुपी राहतील.टिकतील,अशा स्वरुपात कराव्यात.ज्या गोष्टी कार्यालयीन खर्चातून करणे शक्य नाही त्याबाबत अधिक विचार न करता त्यात नेटकेपणा आणून बदल घडवावा,असे सांगूण डॉ.फड म्हणाले,अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपल्यातील चांगूलपणा वाढवून स्वत:ला आनंदी ठेवून जनतेचे सेवक म्हणून काम करावे.या अभियानात वृक्षारोपणासाठी वन विभागाने रोपं उपलब्ध करुन द्यावीत,पक्षासाठी आणि जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी,असे मत त्यांनी व्यक्त केले.

  यावेळी अनेक अधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार करुन त्यावर अंमलबजावणी करण्यात येईल असे सांगण्यात आले.श्रीमती आवले आणि श्री.स्वामी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.

 
Top