उस्मानाबाद/ प्रतिनिधी

तालुक्यातील भंडारी शिवारात तुळजापूर ते औसा मार्गावर एका हॉटेल मालकावर झालेल्या गोळीबारप्रकरणी एकूण सहा जणांवर बेंबळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीपैकी हॉटेलमालक व कामगारांनी पकडलेल्या एकावर रुग्णालयात उपचार सुरू असून इतर आरोपी अद्याप फरार असल्याने त्यांचा शोध सुरू आहे.

भंडारी शिवारातील ‘हॉटेल रिलॅक्स’ येथे दि.३ रोजी दुपारी १२ वाजता अर्जुन नारायण बडवणे, साहिल राजेश जाधव (दोघे रा. परभणी), अभिषेक उद्धव विश्वकर्मा (मुळ यूपी सध्या रा. नाशिक), मुन्ना व अन्य दोन अनोळखी व्यक्ती हे जेवणासाठी आले होते. यावेळी हॉटेमधील सेवा चांगली नसल्याच्या कारणावरून त्यांनी हॉटेल मालक अविनाश बाळासाहेब मोरे (रा. लातूर) यांना शिवीगाळ करून मारहाण केली. त्यापैकी अभिषेक विश्वकर्मा हा चाकू घेऊन अविनाश मोरे व हॉटेल कामगारांवर धावून गेला असता अविनाशचे वडील बाळासाहेब मोरे व हॉटेल कामगारांनी त्यास पकडून ठेवले.

यावर अर्जुन बडवणे याने पिस्तुलाने दोन काडतुसे डागली. त्यातील एक गोळी जमिनीवर लागली तर दुसरी बाळासाहेब मोरे यांच्या छातीत लागून ते गंभीर जखमी झाले.त्यांना उपचारासाठी पुणे येथे दाखल करण्यात आले आहे. या गोळीबारानंतर एकास हॉटेलवरील कामगारांनी पकडून ठेवत चोप दिला तर इतर पाच आरोपी घटनास्थळावरुन कारसह पसार झाले. याप्रकरणी अविनाश मोरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला असून फरार आरोपीच्या शोधार्थ दोन पथके मागावर आहेत. तसेच ताब्यात असलेल्या एकावर उस्मानाबादेत उपचार सुरू आहेत.

 
Top