परंडा /प्रतिनिधी-
जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांची बिंदुनामावली अद्ययावत करून प्रवर्ग निहाय रिक्त जागा खुल्या करून बिंदुनामावलीतील घोळ कायमचा दुर करावा यासाठी जि.प.अध्यक्षा अस्मिताताई कांबळे यांचेकडे प्रहार शिक्षक संघटनेने निवेदन सादर करून सकारात्मक चर्चा केली.
 जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतर जिल्हा बदलीच्या प्रचलित संगणकीय ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी व जलदगतीने राबविण्यासाठी सर्व शिक्षकांच्या बिंदूनामावल्या अद्ययावत असणे आवश्यक असून सदर बिंदुनामावल्या मागासवर्ग कक्षाकडून तपासून त्या एन.आय.सी.पूणे यांना प्रमाणित करून पाठवण्याची जबाबदारी राज्य समन्वयक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.नंदुरबार यांना देण्यात आली होती.राज्य समन्वयक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.नंदुरबार यांचे दि.२० जूलै २०२० च्या पत्रान्वये शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदली बाबत जिल्हा परिषदने बिंदुनामावली नुसार प्रवर्ग निहाय रिक्त जागांची नोंद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे ट्रान्सफर प्रणालीमधील लाॅगिनला दिनांक २३ जूलै २०२० पर्यंत भरावी असे कळविले होते.परंतू जि.प.उस्मानाबाद शिक्षण विभागाने बिंदुनामावली नुसार प्रवर्ग निहाय रिक्त जागा आजतागायत प्रसिध्द केलेल्या नाहीत.राज्य समन्वयक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी नंदुरबार यांचे पत्रक दिनांक ६ ऑगस्ट २०२० अन्वये त्याच दिवशी  सायंकाळ पर्यंत कळवावे असे आदेशीत केले होते.जर माहिती मुदतीत भरली गेली नाही तर पूर्वी भरलेलीच माहिती अंतिम असल्याचे ग्राह्य धरून बदली प्रक्रिया करण्यात येईल.
त्यामुळे आंतर जिल्हा बदलीने उस्मानाबाद जिल्ह्यात येऊ इच्छिणा-या शिक्षकांवर सरळसरळ अन्याय होणार आहे.बिंदूनामावली अद्ययावत करणे कामी आपण लक्ष घालून न्याय द्यावा अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.यावेळी प्रहार शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष वैजिनाथ सावंत,जिल्हा नेते संतुक कडमपल्ले उपस्थित होते.
 
Top