उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
 महाराष्ट्र शासनाने कोविड-19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी दि.30 जून 2020 पर्यंत वाढविला आहे. या लॉकडाऊनच्या  कालावधीत करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार आदेश पारित केले होते . या आदेशातील मुद्दा क्र. 5  नुसार मुद्दा क्र.6 मध्ये नमूद केलेल्या बाबी वगळून ज्या उपक्रमावर बंदी घातलेली नाही असे उपक्रम, बाबी चालू ठेवणेस परवानगी दिलेली आहे.
जिल्हाधिकारी  दिपा मुधोळ-मुंडे यांना प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार लॉकडाऊनच्या कालावधीत उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्र, आधार नोंदणी केंद्र चालू करण्यास खालील अटी व शतींच्या अधीन राहून परवानगी दिली आहे. कोरोना विषाणूचा (COVID-19] प्रादुर्भाव होणार नाही. या अनुषंगाने बायोमेट्रीक  प्रणालीचा  वापर करीत असताना भारत सरकार, महाराष्ट्र शासन व आरोग्य विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.
उस्मानाबाद जिल्ह्यातील चालू असलेल्या व भविष्यात नव्याने निर्माण होणाऱ्या प्रतिबंधित क्षेत्रा (CONTAINMENT ZONE) मध्ये आपले सरकार सेवा केंद्र, आधार नोंदणी केंद्र चालू ठेवण्यास परवानगी असणार नाही. आपले सरकार सेवा केंद्र, आधार नोंदणी केंद्र येथील कर्मचाऱ्यांनी मास्क, ग्लोव्हज, फेस शिल्ड, सॅनिटायझर, कापूस, टिशु पेपर, टिशु पेपरबॅग इत्यादी चा नियमित वापर करावा. बायोमेट्रीक डिव्हाईस, दरवाज्याचे हॅण्डल्स, नोब्स, टेबल, खुर्ची इत्यादीचे सातत्याने निर्जंतुकीकरण (Sanitization) करत रहावे.
आपले सरकार सेवा केंद्र, आधार नोंदणी केंद्रातील कर्मचाऱ्यांनी नियमितपणे सॅनिटायझरचा वापर करावा. तसेच साबणाने हात स्वच्छ धुवावेत. कर्मचाऱ्यांनी  काम करताना डोळे, नाक व तोंडाला स्पर्श करणे कटाक्षाने टाळावे. सर्व आपले सरकार सेवा केंद्र, आधार नोंदणी  केंद्र या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांना बायोमेट्रीक उपकरणाचा वापर करण्यापूर्वी व वापर केल्यानंतर साबणाने स्वच्छ हात धुण्यासाठी प्रेरित करावे व त्यासाठी ग्राहकांना साबण व पाणी उपलब्ध करुन देण्यात यावे.बायोमेट्रीक उपकरण निर्जंतूक (Saritize) करताना वापरलेला कापसाचा बोळा पेपर कव्हरमध्ये ठेवण्यात यावा आणि तो काळजीपूर्वक व पुरेशी दक्षता घेऊन नष्ट करण्यात यावा.
ग्राहकांना त्यांचे नाक व तोंडावर मास्क, स्वच्छ रुमाल बांधणे बाबत सक्ती करावी तसेच रांगेत उभ्या असलेल्या ग्राहकांमध्ये पुरेसे सामाजिक अंतर राहील यादृष्टीने मार्कींग करण्यात यावे. ग्राहकांना सामाजिक अंतराचे पालन करण्याबाबत वारंवार सूचना द्याव्यात. सर्दी, ताप व श्वासोच्छवास  घेण्यास त्रास होणे इत्यादी कोविड-19 ची लक्षणे असलेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात भरती करण्यात यावे. आपले सरकार सेवा केंद्र, आधार नोंदणी केंद्रात उपलब्ध सेवा व त्या सेवांचे दरपत्रक असलेले फलक प्रदर्शित करावा. UIDAI कडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. आधार कॅम्प तसेच कोणत्याही प्रकारच्या शिबिरांचे आयोजन करण्यात येऊ नये.आपले सरकार सेवा केंद्र, आधार नोंदणी केंद्रांनी एका वेळेस जास्तीत जास्त तीन, चार ग्राहकांना अकाउंट समोरील रांगेत उभे राहण्याची परवानगी द्यावी व रांगेतील ग्राहकांचे काम झाल्याशिवाय पुढील ग्राहकांना उभे राहण्यास परवानगी  देऊ नये. यासाठी आवश्यकतेनुसार  ग्राहकांना टोकनचे वाटप करण्यात यावे. गर्दी होणार नाही यादृष्टीने आवश्यक ती उपाययोजना करण्यात यावी.
65 वर्षावरील नागरिक व 10 वर्षाखालील मुले, दुर्धर आजारग्रस्त व्यक्ती, गरोदर महिला यांनी घरीच राहणे आवश्यक असल्याने त्यांना आपले सरकार सेवा केंद्र, आधार नोंदणी केंद्र या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देण्यास मनाई असेल. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या दि. 31 मे, 2020 च्या अधिसूचनेतील परिशिष्ट-1 मध्ये नमूद केलेल्या कोविड-19 च्या व्यवस्थापनासंदर्भातील राष्ट्रीय सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम-2020 चे नियम 11 नुसार भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदींनुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहील.

 
Top