तेर(प्रतिनीधी)
 खरीप हंगामातील दुबार पेरणीचा खर्च एकरी रु.5000 राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने द्यावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आ.राणाजगजितसिंह पाटील यानी मागणी केली आहे.
सोयाबीन हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून खरीपामध्ये सोयाबीनचा सर्वाधिक पेरणी केली जाते. गतवर्षी सोयाबीन पीक काढणीला आले असता अवकाळी पावसाने भिजून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे यावेळी पेरणीसाठी सोयाबीनसह इतर पिकांच्या बियाण्यांची जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कमतरता निर्माण होऊ शकते व शेतकऱ्यांनी कशीबशी शेतातील पूर्व मशागतीची कामे संपविली असली तरी पेरणीसाठी लागणारे बी-बियाणे, खते इत्यादी कोठून आणायचे हा मोठा प्रश्न आज त्यांच्यासमोर उभा राहील या अनुषंगाने वारंवार येणाऱ्या नैसर्गिक संकटाला सामोरे जाऊन कसाबसा उभारण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यास कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या आर्थिक आणीबाणीच्या छायेत खरीप हंगामासाठी बांधावर मोफत बी-बियाणे व खते पेरणीपूर्वी मे महिन्यात उपलब्ध करून देणेबाबत शासन स्तरावर सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा याबाबत मे महिन्यामध्ये शासनाकडे विनंती करण्यात आली. शासनाकडुन या मागणीचा विचार झाला नाही. शेवटी नाईलाजास्तव शेतकऱ्यांनी निकृष्ट दर्जाचे बियाणे वापरुन पेरणी केली. परंतु मुळात बियाणेच सदोष असल्याने उगवण न झाल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे. त्यामुळे निसर्गाच्या दुष्ट चक्राचा कायम सामना करत असलेल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी राज्य सरकारने प्रती एकरी रु.५,००० द्दयावेत अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री .उद्धव ठाकरे यांच्याकडे आ.राणाजगजितसिंह पाटील यानी केली आहे.

 
Top