उस्मानाबाद/प्रतिनिधी -
महाराष्ट्र शासनाने कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचा कालावधी दिनांक 17 मे, 2020 पर्यंत वाढविला आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्यातील मुद्दा क्रमांक 9 (ii) नुसार ग्रीन झोनमध्ये बसमधील बैठक व्यवस्थेच्या  50 टक्के इतक्या क्षमतेने बस सुरु करणेस परवानगी देण्यात आलेली आहे. तसेच बसेसद्वारे फक्त ग्रीन झोनमध्येच प्रवाशी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.
 जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा दीपा मुधोळ-मुंडे यांना प्राप्त अधिकारांनुसार कोरोना विषाणू  (COVID-19 चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता लॉकडाऊनच्या कालावधीत दिनांक 17 मे 2020 पर्यंत उस्मानाबाद जिल्हांतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस सेवा सुरु करण्याबाबत खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून  परवानगी देत आहेत.
 उस्मानाबाद जिल्ह्याचे सीमांतर्गत बस वाहतूक परवानगी असेल. जिल्ह्याचे सीमेबाहेर बस वाहतूक करता येणार नाही. बसच्या प्रवासी आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने प्रवाशांची वाहतूक करण्यास परवानगी असेल. बसच्या प्रत्येक नवीन फेरीपूर्वी व फेरी पूर्ण झाल्यानंतर बसची स्वच्छता तसेच निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक राहील. बसचे चालक व वाहन यांनी नियमितपणे वैयक्तिक स्वच्छता राखणे, मास्क, ग्लोव्हज, गॉगल्स, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील. बसमध्ये येणाऱ्या प्रवाशांनीही मास्क, स्वच्छ रुमालाचा वापर करणे बंधनकारक राहील. कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने तयार केलेली प्रमाणित कार्यपद्धती (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील. बसमध्ये चढत असताना तसेच बसमधून उतरत असताना प्रवाशांनी सामाजिक अंतराचे पालन करणे आवश्यक राहील. यादृष्टीने प्रवाशांना सूचना देणे व आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना वाहकांना देण्यात याव्यात. बस स्थानकांची व त्यांचे परिसराची वारंवार स्वच्छता, निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक राहील. बस स्थानकांवर प्रवाशांची गर्दी होणार नाही यादृष्टीने बसच्या फेऱ्यांचे नियोजन करण्यात यावे. महाराष्ट्र शासनाच्या आदेशातील जोडपत्र-1 मधील मुद्दा क्रमांक 15 नुसार अत्यावश्यक गरजा व आरोग्यविषयक बाबींची पूर्ततेकरिता होणारी हालचाल वगळता 65 वर्षाखालील व्यक्ती, दुर्धर आजारग्रस्त व्यक्ती, गरोदर महिला, 10 वर्षाखालील मुले यांना बसमधून प्रवासाची परवानगी असणार नाही. बसचे चालक, वाहक यांना तसेच प्रवाशांना त्यांचे हाताने त्यांचे नाक, तोंड व डोळ्यांवर स्पर्श न 
करणेबाबत सूचित करावे. कोविड-19 चा प्रादुर्भाव  होऊ नये यादृष्टीने घ्यावयाच्या काळजीबाबत आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या व वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या सूचना तसेच बस स्थानकांवर सामाजिक अंतराचे पालन करण्याबाबत प्रवाशांना ध्वनीप्रक्षेपक यंत्राद्वारे वारंवार सूचना द्याव्यात. सर्दी, खोकला ताप, श्वसनास त्रास इत्यादी लक्षणे आढळून येणाऱ्या चालक, वाहकांना, प्रवाशांना तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयांमध्ये वैद्यकीय तपासणीकरिता दाखल करण्यात यावे. शासनाकडून तसेच आरोग्य विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.
 या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 चे नियम 11 नुसार, भारतीय दंड संहिता ( 45ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदींनुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहील. या आदेशाची अंमलबजावणी आदेशाच्या दिनांकापासून तात्काळ लागू करण्यात येत आहे
 
Top