उस्मानाबाद/प्रतिनिधी - 
 महाराष्ट्र शासनाने  कोव्हिड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचा कालावधी दिनांक 17 मे 2020 पर्यंत वाढविला आहे. या कालावधीत करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. यातील मुद्या क्र.10 मध्ये असू नमूद केले आहे की, राज्य शासनाने वेळोवेळी दिलेले आदेश व मार्गदर्शक सूचनांनुसार परवानगी देण्यात आलेल्या बाबी त्यामध्ये नमूद केलेल्या प्रतिबंधांसह चालू राहतील.
महाराष्ट्र शासनाचे आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले असून  या आदेशातील मुद्या क्र. 9 (7) नुसार राज्य शासनाने निर्धारित केलेल्या किमान अंतराच्या अधीन राहून महामार्गावरील  ट्रक दुरूस्तीची दुकाने (गॅरेज), धाबे सुरु राहतील, असे नमूद केले आहे.   
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा दीपा मुधोळ-मुंडे यांना प्राप्त अधिकारानुसार कोरोना विषाणू (COVID-19)चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  शासनाकडून करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत उस्मानाबाद जिल्ह्यातील महामार्गावरील व राज्य मार्गावरील धाबे खालील अटी व शर्थीच्या आधारे चालू करणेस परवानगी दिली आहे.
धाब्यावर असलेल्या स्वयंपाकगृहामध्ये वारंवार आवश्यक ती स्वच्छता व निर्जतूकीकरण करणे बंधनकारक असेल. तसेच या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तींनी वैयक्तीक स्वच्छता राखणे, मास्क, हॅन्डग्लोज, गॉगल सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे. धाबामध्ये पर्यावरण पुरक (environment friendly) व नष्ट करता येऊ शंकतील अशा (disposable) प्लेट्स, ग्लास, बॉटलस इत्यादीचा वापर करावा. वैद्यकीय निकषानुसार निश्चीत केलेले सामाजिक अंतराचे पालन करणे बंधनकारक असेल. सामाजिक अंतराचे पालन होण्याच्या दृष्टीने  आवश्यक मार्कींग करण्यात यावे. धाबा चालू ठेवण्यासाठी वेळेचे बंधन असणार नाही. धाब्यावर गर्दी होणार नाही यासाठी आवश्यक दक्षता घेण्यात यावी. धाब्यावर जेवणासाठी येणाऱ्या व्यक्तीना हात धुण्यासाठी सॅनिटायझर, साबण, पाणी इत्यादी उपलब्ध करून देण्यात यावे. वेळोवेळी शासनाकडून व आरोग्य विभागाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणे धाबाचालकावर बंधनकार राहील.
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच “ महाराष्ट्र कोव्हीड 19 उपाययोजना नियम 2020” चे नियम 11 नुसार भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदीनुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहील. या आदेशाची अंमलबजावणी आदेशाच्या दिनांकापासून तात्काळ लागू करण्यात येत आहे.
 
Top