उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या निधी अभावी अपूर्ण इमारतींसाठी आवश्यकतेनुसार निधीची तरतुद करावी व वर्षभरात इमारतींची कामे पुर्ण करून रुग्णालये कार्यान्वित करावीत, अशी मागणी आ.राणाजगजितसिह पाटील साहेब यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात चर्चेद्वारे केली.
कळंब येथील उपजिल्हा रुग्णालय तसेच नळदुर्ग, शिराढोण व बेंबळी येथील ग्रामीण रुग्णालयाचे काम प्रगतीपथावर आहे. परंतू आवश्यक प्रमाणात निधीची तरतूद होत नसल्याने या रुग्णालयांची कामे संथगतीने सुरु आहेत. शिराढोण येथील रुग्णालयाचा कारभार पत्र्याच्या शेड मध्ये सुरू आहे. त्यामुळे रुग्ण व आरोग्य कर्मचा-यांना असुविधांचा सामना करावा लागत आहे. उस्मानाबाद चा समावेश नीती आयोगाने निवडलेल्या आकांक्षीत जिल्ह्यात असल्याने नागरिकांच्या आरोग्याला अधिकचे प्राधान्य देणे अभिप्रेत आहे. याबाबत आ.राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी विधीमंडळ अधिवेशनामध्ये काल प्रश्नोत्तरच्या तासात तारांकीत प्रश्न उपस्थित करुन या बाबीची गरज सभागृहात विषद केली. तसेच याबाबत बैठक बोलविण्याची विनंती केली. या प्रश्नाच्या अनुषंगाने इतर सदस्यांनी देखील अनेक उपप्रश्न सभागृहात मांडले.
या प्रश्नाला उत्तर देताना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. राजेश टोपे साहेब म्हणाले की, ज्या रुग्णालयाचे काम 50 टक्के व त्याहुन अधिक झाले आहे, त्यांच्यासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करुन देत वर्षाखेर पर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे सरकारचे धोरण आहे. एशियन डेव्हलपमेंट बँके कडून रु. 4000 कोटी कर्जाची मागणी करण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणचे काम प्राथमिक स्वरुपात आहे, तेथील कामे पुढील टप्प्यात पुर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तसेच आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी मागणी केल्याप्रमाणे याबाबत पुढील आठवड्यात बैठक बोलावण्याचे मा.मंत्री महोदयांनी मान्य केले आहे. या बैठकी मध्ये आरोग्य विभागाशी निगडीत वैद्यकीय महाविद्यालयासाठी आरोग्य विभागाची जागा हस्तांतरीत करणे व यंत्रसामुग्री खरेदी, स्त्री रुग्णालयाची क्षमतावाढ व जुन्या सामान्य रुग्णालयाच्या इमारतीमध्ये स्थलांतर, आयुष रुग्णालयासाठी स्त्री रुग्णालयाची जागा उपलब्ध करुन देणे,प्रस्तावीत ट्रॉमा केअर सेंटर्संना मान्यता देणे व इतर प्रलंबीत विषयावर देखील चर्चा करणार असल्याचे आ.राणाजगजितसिंह पाटील साहेब म्हणाले आहेत.
शासनाने स्पष्ट केलेल्या या धोरणामुळे रुग्णालयांच्या बांधकामासाठी भरीव निधी उपलब्ध होऊन लवकरात लवकर ही रुग्णालये कार्यान्वित होतील अशी अपेक्षा आहे.

 
Top