उस्मानाबाद/प्रतिनिधी-
समाजातील सर्व घटकांनी सायबर सुरक्षा समजून घ्यायला हवी, मोबाईल व इंटरनेटचे गुलाम न होता त्याचा आवश्यक तेवढाच जागरूकतेने वापर करायला हवा, सायबरविषयी जागृती म्हणजेच खरी संगणक साक्षरता, असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पालवे यांनी नुकतेच येथे केले.
वुमन डॉक्टर विंग,उस्मानाबाद आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने डीपीडीसी हॉल,मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे सायबर सुरक्षा या विषयाबाबत जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी वुमन डॉक्टर विंगच्या अध्यक्ष डॉ. मीना जिंतुरकर, सचिव डॉ.कौशाली राजगुरू, कार्यकारी अभियंता अनिल सगर, लीड बँक मॅनेजर निलेश विजयकर, कार्यकारी अभियंता श्री. कांबळे, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, उपशिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार, पोलीस उपनिरीक्षक, सायबर सेल क्रक्रांती ढाकणे, महिला तक्रार निवारण केंद्र प्रमुख माया पानसे, डॉ. चंचला बोडके, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सचिन देशमुख, सचिव डॉ. मिलिंद पोळ, डायटचे प्राचार्य डॉ. इब्राहीम नदाफ, "सायबर सुरक्षा इंटरनेटचा वापर थोडा सबुरीनं..थोडा सावधातेनं.." या पुस्तकाचे संकलक/संशोधक तानाजी खंडागळे, दैनिक संघर्ष समाजवादाचा चे संपादक संतोष हंबीरे, औरंगाबाद विद्यापीठाचे प्रा. वरूण कळसे, सखी वन स्टॉप सेंटरच्या केंद्रप्रमुख वासंती मुळे, माजी महिला व बालविकास अधिकारी अशोक सावंत, वुमन डॉक्टर विंगच्या व इंडियन मेडिकल असोसिएशनचे अन्य पदाधिकारी, अधिव्याख्याता बिरप्पा शिंदे,नारायण मुदगलवाड आदि उपस्थित होते.
अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पालवे पुढे म्हणाले की, मी व माझा हँडसेट हेच माझे जग असे समजून आभासी जीवन जगणारे पिढी झपाट्याने वाढत आहे. अशा आभासी जीवनात प्रत्येकाने सावधपणे पाऊल टाकत आयुष्याची यशस्वी वाटचाल करावी. पूर्वी इंटरनेटची सेवा प्रमुख शासकीय कार्यालयापुरतीच मर्यादित होती मात्र 2001 पासून इंटरनेट वापराची गती प्रचंड वेगाने होत असल्याने या माध्यमातून सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही रोखण्यासाठी प्रत्येकाने मोबाईलचा आणि इंटरनेटचा वापर आवश्यक त्या कामासाठीच केला पाहिजे. मोबाईल व इंटरनेटचा वापर करीत असताना आपण सायबर जगतात किती साक्षर झालो यालाही तितकंच महत्व आहे.
यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या पोलीस उपनिरीक्षक क्रक्रांती ढाकणे या म्हणाल्या की, किंमती वस्तूंपेक्षाही मोबाईलला अधिक महत्त्व आल्याने तो जगण्याचा एक अविभाज्य घटक बनला आहे. प्रत्येक क्षेत्रात मोबाईल इंटरनेटवरून अधिक व्यवहार होत असल्याने सायबर गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, त्याला आळा घालण्यासाठी मोबाईल वापरताना प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. प्रत्येकानं सोशल मिडीयाचाही जपून वापर करावा,आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्यावी,असेही त्या म्हणाल्या.
उपस्थितांशी संवाद साधताना महिला तक्रार निवारण केंद्राच्या प्रमुख माया पानसे म्हणाल्या, महिलांचे सबलीकरण कायद्याने झाले परंतु मनाने नाही. त्यामुळे महिलांनी आपलं वर्चस्व निर्माण करून सन्मानाने जीवन जगायला शिकले पाहिजे.
यावेळी डॉ.सचिन देशमुख, आकाशवाणी निवेदक दौलत निपाणीकर यांनीही सायबर क्रक्राईम मध्ये आपण कसे गुरफटून जातो,आपली कशी फसवणूक होते, हे उदाहरणासहीत आपले अनुभव सांगून स्पष्ट केले.
यानंतर औरंगाबाद विद्यापीठातील प्रा.वरुण कळसे यांनी मोबाईलच्या सुरक्षित वापराविषयी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाव्दारे उपस्थितांना अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिली. याशिवाय सखी वन स्टॉप सेंटर च्या केंद्रप्रमुख वासंती मुळे यांनी सखी वन स्टॉप सेंटरच्या कार्याबाबत उपस्थितांना माहिती दिली.
 
Top